Natural Farming : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, जमिनीची घटती सुपीकता आणि पाण्याच्या गुणवत्तेवर होत असलेले दुष्परिणाम लक्षात घेता, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती पद्धतीकडे वळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (Natural Farming)
त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात सुमारे २,७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती राबविण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली असून, ही माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने देण्यात आली आहे. (Natural Farming)
जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यासाठी ५४ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांमार्फत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. (Natural Farming)
शेतकऱ्यांचे मन वळविणे, रासायनिक शेतीपासून नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे फायदे समजावून सांगणे तसेच जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग विविध उपक्रम राबविणार आहे.
नैसर्गिक शेती ही पूर्णतः रासायनिक इनपुटविरहित शेती पद्धत असून, त्यामध्ये पिके, झाडे आणि पशुधन यांचे एकत्रित व्यवस्थापन केले जाते. कार्यात्मक जैवविविधतेचा उपयोग करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्यातील जालना व भोकरदन तालुक्यांत सर्वाधिक आठ क्लस्टर तयार करण्यात आले असून, या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी सुमारे ४०० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले जाणार आहे.
त्याचप्रमाणे बदनापूर, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड आणि घनसावंगी तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यात येणार आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाण्यांवरील खर्चात बचत होऊन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होईल. शिवाय, जमिनीची सुपीकता वाढल्याने भविष्यातील पिढ्यांसाठीही शेती टिकाऊ राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तालुकानिहाय नैसर्गिक शेती समूह व क्षेत्र (लक्षांक)
| तालुका | समूह संख्या | हेक्टर क्षेत्र |
|---|---|---|
| जालना | ०८ | ४०० |
| बदनापूर | ०६ | ३०० |
| भोकरदन | ०८ | ४०० |
| जाफराबाद | ०६ | ३०० |
| परतूर | ०६ | ३०० |
| मंठा | ०७ | ३५० |
| अंबड | ०७ | ३५० |
| घनसावंगी | ०६ | ३०० |
| एकूण | ५४ | २७०० |
