Natural Farming : रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटत असून शेतीचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढत आहे. (Natural Farming)
परिणामी शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न कमी होत असल्याने शाश्वत, पर्यावरणपूरक आणि खर्चिकदृष्ट्या परवडणाऱ्या शेती पद्धतींची नितांत गरज निर्माण झाली आहे.(Natural Farming)
ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, त्याअंतर्गत परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेतीला चालना दिली जाणार आहे.(Natural Farming)
या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने नैसर्गिक शेती राबविण्यात येणार असून सुमारे ५ हजार ८०० शेतकरी थेट सहभागी होणार आहेत.(Natural Farming)
नैसर्गिक शेतीचा अवलंब करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, जमिनीची सुपीकता टिकवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.(Natural Farming)
प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांवर भर
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण, शेतशिवार प्रात्यक्षिके, तज्ज्ञ मार्गदर्शन, क्लस्टर पद्धत आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. जिल्ह्यात यासाठी ५४ नैसर्गिक शेती क्लस्टर स्थापन करण्यात आले असून प्रत्येक क्लस्टरमध्ये नियोजित दोन प्रशिक्षण कार्यक्रम, सामूहिक चर्चा, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
विविध पिकांवर प्रयोग
या अभियानाअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात विविध पिकांवर नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत. प्रत्यक्ष शेतावर प्रयोग करून शेतकऱ्यांना अनुभवातून मार्गदर्शन दिले जाणार असल्याने नैसर्गिक शेतीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
नैसर्गिक शेती कशी केली जाते?
* देशी गायीवर आधारित निविष्ठांचा वापर
* आच्छादन व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब
* रासायनिक खते व कीटकनाशकांचा पूर्ण किंवा टप्प्याटप्प्याने त्याग
* स्थानिक संसाधनांचा वापर
* मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संवर्धन
नैसर्गिक शेतीचे फायदे
* उत्पादन खर्चात मोठी घट
* जमिनीची सुपीकता व पाणीधारण क्षमता वाढते
* कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी
* आरोग्यदायी, सुरक्षित व दर्जेदार अन्ननिर्मिती
* दीर्घकालीन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग
* शेतकरी गटांना अनुदान
नैसर्गिक शेती क्लस्टरमधील शेतकरी गटांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, निविष्ठा निर्मिती व अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन भत्ता व मानधन दिले जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अनुदान टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे.
कसा घ्यायचा योजनेचा लाभ?
नजीकच्या कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा
शेतकरी गट किंवा क्लस्टरमध्ये नोंदणी करावी
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा
प्रशिक्षणात सहभागी होऊन शेतावर प्रात्यक्षिकांची अंमलबजावणी करावी
या अभियानामुळे नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीला चालना मिळून शेती अधिक लाभदायक ठरणार आहे.
