नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस विशेष (Nashik Jilha Bank) साधारण सभेच्या निर्णयानुसार प्राथमिक शेती संस्था (वि.का. संस्था) स्तरावरील व बँकेचे थेट कर्जाचे थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसुलीसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२५-२६ राबविण्यास मंजुरी मिळालेली आहे. दुसरीकडे हि योजना मान्य नसल्याचे शेतकरी समन्वय समितीने निवेदनातून स्पष्ट केले आहे.
सदरचा प्रस्ताव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्यामार्फत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे सादर केला असता त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग, मुबंई यांचे दिनांक १ ऑगस्ट २०२५ च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या योजनेनुसार बँकेमार्फत कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे कळविलेले आहे.
त्यानुसार जिल्हा बँकेने दिनांक २ ऑगस्ट २०२५ च्या परिपत्रकान्वये थकबाकीदार सभासदांकरिता नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२५-२०२६ लागू केलेली आहे. योजनेत दिनांक ३० जून २०२२ अखेर थकबाकीदार सभासद पात्र राहतील. केंद्र कार्यालयाकडून योजनेचे मंजुरीपत्र मिळाल्यानतंर ३० दिवसांच्या आत १५ टक्के रकमेचा भरणा करावयाचा आहे.
उर्वरित ७५ टक्के रक्कम दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत भरणा करावयाची आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत उर्वरित भरणा न झाल्यास संबंधित थकबाकीदाराने भरलेली रक्कम व्याजात जमा केली जाईल. शिल्लक थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई केली जाईल. गैरव्यवहार किंवा बँकेची फसवणूक करून कर्ज उचल केलेल्या थकबाकीदारांकडून सुरुवातीस प्रचलित पद्धतीने व एन.पी.ए. तारखेनतंर १० टक्के व्याजदराने व्याज आकारणी करण्यात येणार आहे.
एनपीए तारखेपासून व्याजदराची निश्चिती
सभासदांकडील एकूण थकीत रक्कम विचारात घेऊन एन.पी.ए. तारखेपासून पुढीलप्रमाणे व्याजदर निश्चित करण्यात आलेले आहेत. रक्कम रु.१.०० लाखापर्यंत २ टक्के, रक्कम रु. १ ते ५ लाखापर्यंत ४ टक्के. रक्कम ५ ते १० लाखापर्यंत ५ टक्के व रक्कम रु. १० लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार सभासदांकरिता ६ टक्के व्याजदर राहाणार आहे. पात्र सभासदांनी सामोपचार योजनेनुसार एकूण रकमेच्या १० टक्के रक्कम दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांकडून मंत्र्यांना निवेदन
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा २ ऑगस्ट रोजी थेट थकबाकीदार सभासदांकडे थकबाकी वसुलीसाठी सामोपचार कर्जफेड योजनेस विरोध असल्याचे सांगून हा जीआर त्याचा रद्द करावा, नाशिक जिल्हा बँकेने काढलेल्या परिपत्रकास देखील विरोध असल्याचे निवेदन मंत्री माणिकराव कोकाटे, दादा भुसे व नरहरी शिरवळ यांना देण्यात आले. आज रान भाजी महोत्सव निमित्ताने नाशिकला कार्यक्रमात हे तिघेही मंत्री आले होते. तेव्हा शेतकरी समन्वय समितीने भेट घेतली.