नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना चालू गळीत २०२५-२६ हंगामासाठी गाळप होणाऱ्या उसाला प्रती मेट्रिक टन ३ हजार १ रुपये भाव देणार असल्याचे संचालक प्रसाद घावटे यांनी सांगितले.
नाशिक सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२५-२६ साठी २ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविले असून, त्या दृष्टीने माजी खासदार हेमंत गोडसे, शेरजाद बाबा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम सुरू आहे. चालू हंगामात उसाला काय दर जाहीर होतो, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.
संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत उसाला एकरकमी ३००१ रुपये भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखाना गळीत हंगाम सुरू करताना इतर कारखान्यांच्या तुलनेत भाव देण्याचा शब्द आला होता. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट बँक खात्यावर जमा होणार
चालू गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्याचे ऊस पेमेंट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा आणि परिपक्व ऊसपुरवठा कारखान्यास करावा, असे आवाहन कारखाना संचालक प्रसाद घावटे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील, राजेंद्र जंगम, नितीन पारधे, शेतकी अधिकारी अजित गुळवे, विनोद ढगे आदींनी केले आहे.
