Namo Shetkari Yojana : राज्य शासनाच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'चा आठवा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.(Namo Shetkari Yojana)
हप्ता कधी जमा होणार, याची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी सातत्याने बँका, कृषी कार्यालये आणि सेवा केंद्रांच्या चकरा मारत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम कायम आहे.(Namo Shetkari Yojana)
पीएम किसानचा हप्ता मिळाला; 'नमो'कडे लक्ष
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता महिनाभरापूर्वीच वितरित झाला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी हा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ती अपेक्षा आतापर्यंत फोल ठरली आहे.
पडताळणी व ई-केवायसीमुळे लाभार्थी कमी
कृषी विभागाकडून सांगण्यात आले की, ई-केवायसी, आधार–बँक खाते लिंकिंग आणि पात्रतेची पडताळणी सुरू असल्याने यंदा लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.
आयकर भरणारे शेतकरी
सरकारी व निमसरकारी सेवेत असलेले लाभार्थी
ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी
यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच हप्ता मिळणार आहे.
२.८४ लाख शेतकरी प्रतीक्षेत
अमरावती जिल्ह्यात २.८४ लाख लाभार्थी शेतकरी या योजनेत नोंदणीकृत आहेत. आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने हे सर्व शेतकरी बँका व कृषी कार्यालयांत चौकशीसाठी गर्दी करत आहेत. अनेकदा पोर्टल बंद असणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र आहे.
आचारसंहितेचा अडसर आहे का?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ जिल्ह्यांत आचारसंहिता लागू आहे. मात्र, उर्वरित २० जिल्ह्यांत कोणतीही आचारसंहिता नसल्याने निधी वितरणास कायदेशीर अडथळा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हप्ता वर्ग करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
तालुकानिहाय ई-केवायसी पूर्ण लाभार्थी
जिल्ह्यात ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. अचलपूर – २३,४६५, अमरावती – १६,७९४, अंजनगाव – २०,०६८, भातकुली – १६,७६३, चांदूर रेल्वे – १४,३४१, चांदूर बाजार – २६,९५४, चिखलदरा – ११,४७२, दर्यापूर – २५,२७५, धामणगाव रेल्वे – १८,७७०, धारणी – १८,१९५, मोर्शी – २५,८८३, नांदगाव – २३,५१८, तिवसा – १५,७६१, वरुड – २७,५११.
ई-केवायसी न केल्यास लाभ नाही
कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी, आधार-बँक खाते लिंकिंग आणि जमिनीच्या नोंदीतील त्रुटी दुरुस्ती पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हप्ता कधी मिळणार?
'नमो शेतकरी महासन्मान' योजनेंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, आठव्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर झालेली नाही.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार लवकरच निधी वर्ग करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
