चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) या संस्थेच्या "बांबू हस्तकला" आणि "बांबू फर्निचर" या अल्पमुदत व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिकृत मान्यता मिळाली आहे.
या मान्यतेमुळे या अभ्यासक्रमांना आता विद्यापीठीय ओळख प्राप्त झाली असून प्रशिक्षणार्थीना विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार क्रेडिटचे असून, यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात डिप्लोमा, पदवी किंवा उच्च अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे अधिक सुलभ होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या बांबू औद्योगिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर, या मान्यतेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे प्रशिक्षणार्थीना शासकीय योजना, शिष्यवृत्ती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. या मान्यतेसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन व वन्यजीव) आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संचालक मनोज खैरनार आणि त्यांच्या टीमने सातत्यपूर्ण प्रयत्न व दूरदृष्टी दाखवून ही मान्यता मिळवली.
विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीची पाहणी
बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राला मान्यता देण्यापूर्वी नागपूर विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण व विस्तार विभागाने चिचपल्ली येथे भेट देऊन संस्थेच्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण पद्धती, तांत्रिक मनुष्यबळ व गुणवत्तेचे मूल्यमापन केले. समितीच्या सकारात्मक अहवालानंतर विद्यापीठाने मान्यता प्रदान केली.