NAFED Soybean Registration : अकोला, बाळापूर आणि नांदगाव खंडेश्वर या भागात नाफेडकडून सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू होताच शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. (NAFED Soybean Registration)
आधारभूत किमतीवर विक्रीची संधी मिळणार असल्याने शेतकरी उत्साहित आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांनी संयम राखावा आणि दिलेल्या वेळापत्रकानुसारच नोंदणी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.(NAFED Soybean Registration)
अकोला केंद्रावर पहाटेपासूनच नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली. अनेक ठिकाणी महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना संयम ठेवण्याचे आणि निश्चित वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(NAFED Soybean Registration)
बाळापूर : मुख्य मार्ग ठप्प, वाहनांच्या रांगा, शेतकऱ्यांत नाराजी
बाळापूर येथील नाफेडच्या एकमेव खरेदी केंद्रावर ३१ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होताच परिसरात हजारो शेतकऱ्यांची गर्दी झाली. संघाच्या कार्यालयासमोरील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
ऑनलाइन नोंदणी प्रणाली मंदावल्याने अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाइन कागदपत्रे स्वीकारण्याचे आदेश दिले, ज्यामुळे गर्दी थोडी कमी झाली.
मात्र, सुविधा अपुऱ्या असल्याने आणि प्रक्रिया किचकट असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे शासनाने ही प्रक्रिया सुलभ करावी, तसेच थंब मशीनऐवजी मोबाइल ओटीपी प्रणाली लागू करावी, अशी मागणी केली.
या वर्षी अकोला जिल्ह्यात नाफेडचे केवळ एकच खरेदी केंद्र बाळापूर खरेदी-विक्री संघालाच मंजूर झाले आहे. सध्याच्या बाजारभावात आणि शासनाच्या हमीभावात तब्बल १ हजार रुपये ते १ हजार ५०० रुपयांचा फरक असल्याने शेतकऱ्यांचा कल नाफेडमार्गे विक्रीकडे वाढला आहे.
ऑनलाइन नोंदणी ओटीपीद्वारे घेण्यात यावी; थंब मशीन प्रक्रिया रद्द करावी. - योगेश्वर वानखडे, माजी पंचायत समिती सदस्य, बाळापूर
नांदगावात शेतकऱ्यांची रात्रभर प्रतीक्षा
नांदगाव खंडेश्वर येथे गुरुवारी रात्रीपासूनच शेतकरी नोंदणी केंद्राबाहेर थंडीत थांबले. रात्री ९ पासून रांगा लागल्या आणि शुक्रवारी सकाळी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीची भीती निर्माण झाली. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी ४ वाजेपर्यंत २ हजार ५०० हून अधिक अर्ज स्वीकारले गेले.
हजारोंच्या गर्दीतून कसाबसा माझा अर्ज टेबलवर पोहोचला. आता सोयाबीनचे मोजमाप झाल्यावरच निश्चिंत होऊ शकतो.- पंकज जगणे, शेतकरी, जामगाव
शेतकऱ्यांचे दुपारी ४ वाजेपर्यंत अडीच हजारांवर अर्ज झाले. गुरुवारी दुपारी ४ वाजता जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारा असे आदेश आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी झाली.- बाळासाहेब रोहनेकर, उपाध्यक्ष
शेतकऱ्यांसाठी नाफेडकडून सोयाबीन खरेदी नोंदणीसंबंधी महत्त्वाच्या सूचना
* नाफेडकडून सोयाबीन खरेदीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ऑनलाइन किंवा सेवा केंद्रामार्फत नोंदणी करणे बंधनकारक आहे.
* नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
७/१२ व ८अ उतारा (ताज्या पिकासह)
आधार कार्ड
बँक पासबुक (IFSC सहित)
मोबाईल क्रमांक (OTP साठी सक्रिय असावा)
PAN कार्ड (असल्यास)
* नोंदणी करताना आपल्या जवळच्या खरेदी केंद्राचे नाव योग्य प्रकारे निवडा. नंतर बदल करता येत नाही.
* शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावावर असलेल्या शेतीत घेतलेल्या सोयाबीन पिकाचीच विक्री करता येईल.
* हमीभाव (MSP) अंतर्गत खरेदी केली जाईल.
