नाशिक : कांदा खरेदीसाठी (Kanda Kharedi) नोंदणी करण्याकरिता नाफेडने दि. ९ जूनपासून जे पोर्टल सुरू केले. त्यावर तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. अनेकदा तर सर्व्हर डाऊन असतो. सहा दिवसांत केवळ एक हजार शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली असून, नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाल्यावर आमचा कांदा घेतला तरी जाईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन आणि पासवर्ड टाकून शेतकऱ्यांना पुन्हा पोर्टलवर प्रवेश करता येत नसून सर्व कागदपत्र डाऊनलोड करूनही इनव्हॅलीड पासवर्डचा मॅसेज येत असल्याने नोंदणीविना घोडे अडले आहे. कांदा खरेदी सुरू करण्यासाठी नाफेडला (Nafed Kanda Kharedi) यंदा उशिरा जाग आली. नोंदणीसाठी पोर्टल तर खुले केले; पण नोंदणी कशी करावी, याचे साधे प्रात्याक्षिक किंवा मार्गदर्शन नाफेडने केले नाही.
त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. नाफेडने दिलेली वेबसाइट खुली होते. सातबारा उतारा, आधार कार्ड झेरॉक्स व इतर कागदपत्र लोडदेखील होतात. मात्र रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येत आहे, तर दुसरीकडे नाफेडने सोमवारपासून कांदा खरेदीची ट्रायल (चाचणी) सुरू केली आहे. पोर्टलवर नोंदणीच होत नसल्याने आमचा कांदा नाफेड घेईल का? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहे. पासवर्ड पूर्णपणे अचूक टाकूनदेखील इनव्हॅलीडचा मॅसेज येत असल्याचे शेतकरी सांगताहेत. नाफेडने यंदा कांद्याला पहिल्या आठवड्यात १४३५ चा भाव निश्चित केला आहे.
Nafed Kanda Kharedi : नाफेडच्या कांदा खरेदीचा भाव ठरला! अन् बाजारात काय दर मिळतोय?
पोर्टलला अडचण आल्याची केस अशी.....
नाफेडची कांदा खरेदीची नोंदणी पोर्टलवर सुरू करण्यात आली. मात्र यात शेतकऱ्यांचा बराचवेळ खर्ची पडत असल्याचे सांगण्यात आले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन आणि पासवर्ड टाकून शेतकऱ्यांना पुन्हा पोर्टलवर प्रवेश करता येत नाही. तालुका सिलेक्ट करायचा असतो, पण कोणत्या फर्मला कांदा देणार याची नोंदणीच होत नाही. या संदर्भातील तक्रार महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी केली आहे. भदाणे यांनी स्वतः नोंदणी केल्यानंतरचा अनुभव सांगितला.
खरेदीच्या शुभारंभासाठी केंद्रीय कृषिमंत्री येणार
गेल्या महिनाभरापासून नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीची प्रतीक्षा करून वैतागलेल्या कांदा उत्पादक शेतक-यांना आता कुठे दिलासा मिळाला असून सोमवारपासून (दि.१६) ट्रायल खरेदी सुरू झाली. दि. २० जूनपासून नियमित खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या खरेदीचा शुभारंभ होण्याची शक्यता असून, त्यांच्या नाशिक दौऱ्याचे नियोजन नाफेड तसेच सहकार विभागाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशी होईल यंदाची कांदा खरेदी
यंदा नाफेड सोबतच एनसीसीएफची खरेदी लांबली असून शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे. या आठवड्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून २ लाख ४० हजार आणि उर्वरित महाराष्ट्रातून २ लाख ६० हजार मे. टन कांदा खरेदी होईल. ४० हजार मे. टन कांदा खरेदी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक येथून होणार असल्याचे सांगण्यात आले.
उशिराने धोरण
कांदा खरेदीत मागील वर्षी घोळ झाल्यानंतर नाफेड आणि एनसीसीएफने यंदा कांदा खरेदीचे धोरण नेहमीपेक्षा उशिराने आखले. अखेर खरेदीसाठीची ट्रायल सुरू करण्यात आली. त्यात कांदा विक्री करताना नाफेडच्या केंद्रावर काही अडचण येत आहे का, एका शेतकऱ्याच्या कांदा खरेदीसाठी किती वेळ लागतो, याची चाचणी सध्या सुरू आहे.