नाशिक : अधिकार अभिलेखातील दुरूस्तीसाठी आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीस खातेदार व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
यापुढे दर मंगळवारी जिल्ह्यातील 121 मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात फेरफार अदालीतीचे आयोजन करण्यात येणार असून खातेदार व नागरिकांनी मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून प्रकरणांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
आज आयोजित फेर फार अदालतीत तालुक्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी काही ठिकाणी भेट देवून कामकाजाची पाहणी करीत मार्गदर्शन केले. स्थानिक पातळीवर क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांच्या DSC (Digital Signature Certificate) जमा केलेल्या असल्या तरी स्वत: कार्यालयात ऑफलाईन कामकाम सुरू ठेवले होते.
दर मंगळवारी जिल्ह्यातील 121 मंडळ अधिकारी कार्यालयात होणाऱ्या फेरफार अदालतीत मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात स्वत: मंडळ अधिकारी त्यांच्या मंडळातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) हे उपस्थित राहणार आहेत. खातेदार यांच्या 7/12 संबंधित निगडीत अडचणी, दुरुस्ती, वारस नोंदी चौकशी तसेच दाखले कामकाज, स्थानिक चौकशी प्रकरणे इत्यादी कामकाज या दिवशी केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कळविले आहे.
