Mission Ubhari : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आजही संपलेला नाही. या वेदनादायक वास्तवावर उपाय शोधण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 'मिशन उभारी' हा संवेदनशील आणि परिणामकारक उपक्रम हाती घेतला आहे. (Mission Ubhari)
या प्रकल्पाचा उद्देश असा की, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नवजीवन देणे, त्यांची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक पुनर्बांधणी करणे हा आहे. (Mission Ubhari)
यवतमाळ जिल्हा पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबांच्या आशेचा केंद्रबिंदू ठरतोय. वाढत्या आत्महत्यांच्या छायेत जगणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'मिशन उभारी' (Mission Ubhari) हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाच वर्षांतील ७७० शेतकरी कुटुंबांचा सर्वेक्षण उपक्रम
'मिशन उभारी' अंतर्गत गेल्या पाच वर्षांतील ७७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून खालील मुद्द्यांचा तपशील गोळा केला जाणार आहे. (Mission Ubhari)
कुटुंबाची सध्याची आर्थिक स्थिती
शेतीतील उत्पादन आणि उत्पन्नाचा स्तर
मुलांचे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य
घरकुल, सामाजिक सुरक्षा आणि सरकारी योजनांचा लाभ
मुलींचे शिक्षण व विवाह स्थिती
जिल्हा प्रशासनाने या सर्व माहितीचा डेटाबेस तयार करून डिजिटल स्वरूपात एकत्रित नोंदणी केली आहे. त्यामुळे एका क्लिकवर कोणत्याही कुटुंबाची वस्तुस्थिती समजून घेता येणार आहे.
नोडल अधिकाऱ्यांकडे पालकत्वाची जबाबदारी
या उपक्रमात प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे पालकत्व नोडल अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. गावपातळीवर मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि इतर प्रशासनिक अधिकारी या कुटुंबांच्या सततच्या संपर्कात राहून त्यांची अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतील.
कुटुंबांवर कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, कुठे मदतीची गरज आहे, हे अधिकाऱ्यांकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अहवालाच्या स्वरूपात पोहोचवले जाईल.
२५ वर्षांत ६ हजार ३२३ शेतकऱ्यांचा मृत्यू
गेल्या २५ वर्षांतील आकडेवारी भयावह आहे. यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ६ हजार ३२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,
त्यापैकी २ हजार ५२२ कुटुंबांना सरकारी मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
'मिशन उभारी' प्रकल्प या पार्श्वभूमीवर सुरू होत असून, तो शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
प्रकल्पाचे उद्दिष्ट
आत्महत्याग्रस्त कुटुंबांची मानसिक आणि आर्थिक पुनर्बांधणी
शिक्षण, रोजगार, घरकुल यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणे
सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे
शेतकरी कुटुंबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे
एका क्लिकवर मिळणार माहिती
या प्रकल्पासाठी प्रशासनाने एक डिजिटल प्रश्नावली प्रणाली विकसित केली आहे. त्यात कुटुंबातील सदस्यांची माहिती, शेतीचा आकार, उत्पन्न, सरकारी लाभांची स्थिती, आरोग्यविषयक माहिती अशा असंख्य बाबींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कुठले कुटुंब तातडीच्या मदतीस पात्र आहे, हे त्वरित समजणार आहे.
मिशन उभारीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची खरी परिस्थिती समजून घेत आहोत. त्यांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन प्रशासन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक कुटुंबाची समस्या ओळखून ती सोडवणे हेच आमचं ध्येय आहे. - विकास मीना, जिल्हाधिकारी
यवतमाळ जिल्हा हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक ओळखले जाणारे क्षेत्र आहे. 'मिशन उभारी' हा उपक्रम केवळ सर्वेक्षण नसून आशेचा किरण आहे. या प्रकल्पाद्वारे शासन आणि प्रशासन शेतकरी कुटुंबांच्या दुः खाला हात देऊन त्यांना नव्या उभारीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे.