जळगाव : नोव्हेंबर महिन्यात बाजारात दाखल होणारी मेहरुणची बोरं (Mehrun Bore) यंदा १५ ते २० दिवस उशिराने दाखल होणार आहेत. मान्सून परतल्यानंतर 'अवकाळी'ने (Unseasonal Rain) फटका दिल्यामुळे उत्पादन उशिराने हाती पडणार आहे. मात्र या बोरांची अविट गोडी जैसे थे चाखायला मिळणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दरवर्षी मेहरुणच्या बोरांची आवक नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक सुरूच असते. तोडणीसाठी लागणारा मजूर वर्ग दोन महिने बोरांच्या छायेतच असतो. यंदा मात्र बोरांचा 'मुहूर्त' चुकला आहे. १५ ते २० दिवसांनी बोरांची आवक बाजारात होणार असल्याचे उत्पादकांनी सांगितले. बोरांच्या परिपक्वतेसाठी आणखी १५ ते २० दिवस लागणार आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर मेहरुणच्या बोरांची आवक सरू होणार आहे.
उत्पादकांसाठी 'हंगाम'च
अनेक शेतकरी हे पीक बांधावरचे म्हणून घेतात. वेचणी, मजुरी, वाहतुकीव्यतिरिक्त फारसा खर्च या पिकाला येत नाही. त्यामुळे आर्थिक बळ देणारे महत्त्वाचे कोरडवाहू पीक म्हणून मेहरुण बोरांकडे पाहिले जाते. बोरीला दोन बहार येतात. झाड मोठे असेल तर १०० ते १२५ किलो बोरे मिळतात. दुसरा बहार येतो तेव्हा या बोरांचा आकार लहान झालेला असतो. त्यास खिरणी बोर म्हटले जाते. संक्रांतीनंतर खिरणी बोरांचा सिझन सुरू होतो.
मेहरुणच्या बोरांची राज्यभर विशेष ओळख आहे. यामुळे या झाडांचे व या वाणाचे जतन करण्याची आवश्यकता आहे. ही बोरे आकाराने लहान, रसाळ व अवीट गोडीची म्हणून प्रसिद्ध आहेत. मेहरुणच्या बोरांचा गोडवा राज्यभर लोकांच्या जिभेवर असल्याने त्याला मागणीही खूप असते. पुणे, मुंबईला राहणारे नातेवाईक हक्काने मेहरुणची बोरं मागवून घेतात.
Onion Diseases : कांदा रोपवाटिकेत मर रोग कशामुळे? नियंत्रणासाठी हे उपाय करा, वाचा सविस्तर