Mango Pest Management : आंब्याला मोहर येण्याचा काळ सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. भुरी रोग आणि कोळी कीटकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोहर मोठ्या प्रमाणावर गळत असून फळधारणेवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.(Mango Pest Management)
हवामानातील सततच्या बदलांमुळे रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले असून, वेळीच उपाय न केल्यास आंबा उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.(Mango Pest Management)
अकोला जिल्ह्यात सध्या आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाली असून, याच काळात मोहरावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे.(Mango Pest Management)
विशेषतः भुरी रोग आणि कोळी कीटक यांच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मोहर मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने आगामी आंबा उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(Mango Pest Management)
जिल्ह्यात सुमारे ६१ हेक्टर क्षेत्रावर आंब्याच्या फळबागा असून, याशिवाय हजारो शेतकऱ्यांच्या शेतात गावरान आंब्याची झाडे आहेत.(Mango Pest Management)
दरवर्षी या झाडांपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्या सुरू असलेल्या किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची भीती आहे.(Mango Pest Management)
हवामान बदलामुळे वाढला प्रादुर्भाव
सध्या ढगाळ वातावरण, थंडी, ऊन आणि मधूनमधून होणारा पाऊस असा हवामानाचा लहरी क्रम सुरू आहे. याच काळात आंब्याला मोहर येत असल्याने किडी व बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मोहराच्या सुरुवातीच्या अवस्थेतच रोगाची लागण झाल्यास नुकसान अधिक होते.
भुरी रोग नेमका काय आहे?
आंब्यावरील भुरी रोग हा ओइडिअम मेन्जिफेरी (Oidium mangiferae) या बुरशीमुळे होतो. या बुरशीचा रंग पांढरट असून, मोहर किंवा कोवळ्या पालवीवर पांढऱ्या भुकटीसारखा थर दिसून येतो.
बुरशीची बीजे मोहरावर उगवून पेशींमध्ये शिरतात व अन्नरस शोषतात. सुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव मोहराच्या शेंड्यापासून सुरू होऊन हळूहळू संपूर्ण मोहरावर पसरतो.
जर प्रादुर्भाव तीव्र झाला, तर ७० ते ८० टक्क्यांपर्यंत मोहराचे नुकसान होऊ शकते. मोहर फुटल्यानंतर लगेचच रोग आल्यास फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ होते आणि फळधारणा होत नाही.
कोळी कीटकाचा धोका
मोहरावर आढळणारे लाल रंगाचे सूक्ष्म कोळी उघड्या डोळ्यांना सहज दिसत नाहीत. हे कोळी पानांच्या खाली जाळी तयार करून राहतात आणि पानातील रस शोषतात. त्यामुळे पाने तेलकट, तांबूस होतात, अर्धवट वाळतात व नंतर मोठ्या प्रमाणात पानगळ होते. मोहरावर कोळी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास उत्पादनावर थेट परिणाम होतो.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
कृषी तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या मोहराची नियमित पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीच्या अवस्थेतच रोग किंवा किडींची लक्षणे दिसताच योग्य शिफारसीनुसार फवारणी करावी. अनावश्यक फवारण्या टाळून हवामानाचा अंदाज घेऊन उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येऊ शकते.
सध्या मोहराचा हा अत्यंत संवेदनशील काळ असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहून वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
एकात्मिक उपाय करावा
* रोगट मोहर व पाने काढून नष्ट करावीत.
* बागेत हवा खेळती राहील अशी छाटणी (प्रूनिंग) करावी.
* नत्राचे प्रमाण मर्यादित ठेवावे; संतुलित खत व्यवस्थापन करावे.
* झाडावर पाण्याचा ताण येऊ देऊ नये, मात्र अति सिंचन टाळावे.
महत्त्वाच्या सूचना
* फवारणी करताना एकाच वेळी बुरशीनाशक व कीटकनाशक मिसळताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
* फुलोऱ्याच्या टप्प्यावर अतिरिक्त रसायने टाळा, अन्यथा फळधारणा कमी होऊ शकते.
* शक्य असल्यास जैविक फवारण्या (निंबोळी अर्क ५%) वापराव्यात.
