Mango Pest Management : यंदा हिवाळा नेहमीपेक्षा अधिक काळ टिकल्याने आंबा बागांमध्ये मोहोर भरघोस आला होता. गावरान, केशर, पायरी आदी सर्वच जातींमध्ये फांद्यांवर डोलणारा मोहोर पाहून बागायतदारांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. (Mango Pest Management)
मात्र, फेब्रुवारीत अचानक वाढलेले ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंबा बागांवर 'भुरी' (पावडरी मिल्ड्यू) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(Mango Pest Management)
मोहोर अवस्थेतच मोठा फटका
'भुरी' हा बुरशीजन्य रोग प्रामुख्याने मोहोर अवस्थेत आढळतो.
मोहोरावर पांढरट पावडरसारखी बुरशी दिसू लागते.
फुले काळवंडून कोमेजतात.
मोठ्या प्रमाणावर मोहोर गळती होते.
यामुळे फळधारणा घटण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक बागांमध्ये डोळ्यांदेखत मोहोर गळताना दिसत असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
वाढता खर्च, घटते उत्पन्न
आंबा बागांसाठी वर्षभर खत व्यवस्थापन, पाणीपुरवठा, कीड नियंत्रण यावर मोठा खर्च करण्यात आला.
ऐन हंगामात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.
एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे उत्पन्न घटण्याची शक्यता असल्याने आर्थिक संकटाचे सावट गडद झाले आहे.
शेतकऱ्यांची व्यथा
'रात्रंदिवस मेहनत करून बागा जगवल्या. यंदा मोहोर चांगला असल्याने मोठी आशा होती; पण डोळ्यांदेखत मोहोर गळताना पाहून काळजात धस्स होत आहे. बागा वाचवायच्या कशा, हा प्रश्न आहे,' असे अनेक बागायतदार सांगतात.
काही शेतकरी मोहर गळती कमी करण्यासाठी विविध उपाय करत असून, काहींनी तर झाडांवर जाळी (नेट) टाकण्याचे प्रयोग सुरू केले आहेत.
तज्ज्ञांचा सल्ला
* भुरी रोग नियंत्रणासाठी वेळेत उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
* ८० टक्के पाणीमिश्रित गंधकाची फवारणी प्रभावी ठरू शकते.
* कार्बनडाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
* हवामानातील बदलांवर सतत लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.
* योग्य वेळी फवारणी केल्यास काही प्रमाणात नुकसान टाळता येऊ शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
हंगामावर अनिश्चिततेचे सावट
हवामान अनुकूल राहिले नाही आणि रोग नियंत्रणात आला नाही, तर यंदाचा आंबा हंगाम तोट्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.
भरघोस मोहोराने आशावादी झालेल्या आंबा उत्पादकांसमोर आता 'भुरी' रोगाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
योग्य वेळी नियंत्रणात्मक उपाय न केल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. निसर्ग पुन्हा अनुकूल होईल आणि नुकसान कमी होईल, अशीच आशा बागायतदार व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Mango Pest Management : आंब्याचा मोहर गळतोय का? वेळीच करा 'या' उपयायोजना
