बाबासाहेब धुमाळ
शासनाने मक्यासाठी प्रतिक्विंटल २ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर केल्याने दुष्काळी परिस्थितीत काहीसा आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होती. (Makka Kharedi)
शासकीय हमीभाव खरेदी केंद्र मंजूर होऊन महिना उलटूनही प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. (Makka Kharedi)
कधी गोदाम उपलब्ध नाही, तर कधी बारदाना नसल्याचे कारण देत प्रशासन खरेदी टाळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.(Makka Kharedi)
१ हजार ४२० शेतकरी नोंदणीकृत; तरीही खरेदी शून्य
वैजापूर येथे २०२५–२६ हंगामासाठी मका हमीभाव खरेदी केंद्र नोव्हेंबर २०२५ पूर्वीच मंजूर करण्यात आले होते.
या केंद्रावर मका विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक असल्याने ३ नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. बाजार समितीच्या सूचनेनुसार तालुक्यातील १ हजार ४२० शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली. मात्र, आजतागायत एकही क्विंटल मका शासकीय केंद्रावर खरेदी झालेला नाही.
खासगी बाजारात कवडीमोल दर
१२ डिसेंबर रोजी वैजापूर बाजार समितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी तक्रार केली की, प्रत्यक्ष लिलावात मक्याला केवळ १ हजार २०० ते १ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
व्यापाऱ्यांनीही मका खरेदी करणाऱ्या कंपन्यांचे सध्याचे दर १ हजार ८७५ ते १ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे आशेने पाहिले; मात्र ते केंद्रच सुरू नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
गोदाम असूनही खरेदी नाही
सुरुवातीला प्रशासनाकडून खरेदी केलेला मका साठवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. यामुळे खरेदी-विक्री संघ (खविस) व पुरवठा विभागाकडून खासगी गोदामांचा शोध घेण्यात वेळ घालवण्यात आला.
प्रत्यक्षात बाजारतळ परिसरात पुरवठा विभागाची प्रत्येकी ५ हजार मेट्रिक टन क्षमतेची दोन शासकीय गोदामे उपलब्ध आहेत. यापैकी एक मोडकळीस आले असले, तरी दुसरे गोदाम सुस्थितीत आहे.
याशिवाय बाजार समितीच्या सेल क्रमांक ३ हॉललगतही गोदाम उपलब्ध आहे, असे असतानाही अधिकारी खासगी गोदामांचा शोध घेत फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
आता बारदाना कारण ठरतोय अडथळा
गेल्या आठवड्यात शहरातील शासकीय गोदामात साफसफाई करून खरेदी सुरू करण्याचे निश्चित झाले. मात्र, आता मका भरण्यासाठी आवश्यक बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.
खरेदी-विक्री संघाने जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडे बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी ई-मेलद्वारे केली असून, बारदाना मिळाल्यानंतर खरेदी सुरू केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
'व्यापाऱ्यांच्या हितासाठी दिरंगाई?' शेतकऱ्यांचा आरोप
खासगी व्यापारी सध्या १ हजार ८०० ते १ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करत आहेत, तर शासकीय हमीभाव २ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल आहे.
शासकीय केंद्र सुरू झाल्यास शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे जाणार नाहीत. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठीच हमीभाव केंद्र सुरू करण्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
बाजार समिती परिसरातच शासकीय खरेदी होणार आहे. मका भरण्यासाठी आवश्यक बारदाना मिळावा, यासाठी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडे ई-मेलद्वारे मागणी केली आहे. बारदाना उपलब्ध होताच शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात येईल.- अनिल चव्हाण, सचिव, खरेदी-विक्री संघ
शेतकऱ्यांचा संताप वाढतोय
दरम्यान, महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे नाईलाजाने आपला मका पडत्या दरात विकावा लागत आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हमीभावाचा लाभ न मिळाल्याने वैजापूर तालुक्यातील मका उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
