Mahavitaran : महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षाच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश प्रसिद्ध केला आहे. महावितरणने ५ वर्षांत वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य केला आहे.
यामुळे घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार असून, महिना शंभर युनिटपर्यत वीजग्राहकांसाठीचा सरासरी दर ७ रुपये ३१ पैशांवरून कमी होऊन ७ रुपये १० पैसे होईल. या ग्राहकांसाठीचा वीजदर ५ वर्षांत २६ टक्के इतका कमी होणार आहे.
१०० ते ३०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठीचा दर १३ रुपये १७ पैसे यावरून कमी होऊन १२ रुपये ९४ पैसे तर उच्च औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ७८ पैसे यावरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे इतका होईल.
उद्योग व व्यावसायिकांना अच्छे दिन...!
उद्योगांना व व्यावसायिक वीजग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत चालूच राहणार आहे. या ग्राहकांना वीजदरात एप्रिल ते 3 सप्टेंबर महिन्यात १५ टक्के, तर आक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत मिळणार आहे. परिणामी उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या पहिल्या पाळीत त्यांना सवलतीच्या दराने वीज मिळेल.
नवीन दर कसे राहतील, ते सविस्तर पाहुयात
| वीजवापर युनिट संख्या | २०२६ | २०२७ | २०२८ | २०२९ | २०३० |
|---|---|---|---|---|---|
| १ ते १०० युनिट | ७.३१ | ७.१० | ७.०० | ६.२० | ६.०० |
| १०१ ते ३०० युनिट | १३.१७ | १२.९४ | १२.७९ | १२.६२ | १२.६२ |
| ३०१ ते ५०० युनिट | १७.५६ | १७.३५ | १७.२७ | १६,३५ | १६.३८ |
| ५०० हून अधिक युनिट | १९.१५ | १९.१४ | १९.४० | १८.४७ | १८.४७ |
वीजदर टप्प्याटप्प्याने होणार कमी
घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवगार्तील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. शहरासोबत जिल्ह्यातील वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलरचा वापर वाढला आहे. पुढील पाच वर्षात २६ टक्क्यांची कपात होणार आहे. असे महावितरणकडून जाहीर करण्यात आले आहे.
