Maharashtra Flood : माहे सप्टेंबर, २०२५ मध्ये राज्यामध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहू व १० किलो तांदुळ मोफत पुरविण्यास महसूल व वन विभागाच्या माध्यमातून शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.
अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. शेकडो गावे पुरामुळे बाधीत झालेली आहेत. पिकांचे-घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाने मोफत पुरवठा करण्यास मान्यता दिलेल्या व विभागामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नधान्यामध्ये तांदूळ व गव्हासमवेत ३ किलो तूरडाळीचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत.
अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब देण्यात येणाऱ्या १० किलो गहू, १० किलो तांदुळ व ५ लिटर केरोसिन समवेत ३ किलो तूर डाळीचे मोफत वितरण करण्यास चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता मान्यता देण्यात येत आहे. सद्यस्थितीत गव्हापासून पीठ तयार करणे जिकरीचे असल्यामुळे बाधित कुटुंबाने मागणी केल्यास, त्यांना देण्यात येणाऱ्या १० किलो गव्हाऐवजी १० किलो तांदूळ म्हणजेच एकूण २० किलो तांदुळाचे वाटप करावे.
अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तूर डाळ वितरित करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी :
संबंधित जिल्हाधिकारी यांनी घाऊक बाजारामधील किंमतीस सुसंगत दराने तूर डाळीची खुल्या बाजारामधून खरेदी करावी.
संबधित जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील महसूल विभागाकडून नैसर्गिक आपत्ती सुरु झाल्याची तारीख / घोषणापत्र, अतिवृष्टी / पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या, वितरित केलेली तूर डाळ, तूर डाळ खरेदी करण्यासाठी आलेला खर्च इ. बाबतची माहिती ना. पु. २२ कार्यासनास व वित्तीय सल्लागार व उप सचिव यांचे कार्यालयास सादर करावी.
जिल्ह्यांकडून निधीची मागणी करण्यात आल्यास सन २०२५-२६ करिता उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून जिल्ह्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.