Mahadbt Scheme : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सुरू असलेल्या विविध कृषी योजनांद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे. (Mahadbt Scheme)
याच पार्श्वभूमीवर सन २०२५-२६ या वर्षाकरिता जालना जिल्ह्यातील तब्बल २ लाख ८२ हजार ६२५ शेतकऱ्यांची निवड विविध योजनांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये ४२ हजार ८८३ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, तर ४२ हजार ६८७ शेतकऱ्यांना तुषार सिंचन योजनेचा लाभ मिळणार आहे.(Mahadbt Scheme)
महाडीबीटी प्रणाली अंतर्गत ठिबक, तुषार, सामूहिक शेततळे, फळबाग लागवड, कांदा चाळ, कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या योजनांमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड 'प्रथम अर्ज, प्रथम निवड' या तत्त्वावर करण्यात आली आहे.(Mahadbt Scheme)
जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे तपशील (संख्या)
योजना | लाभार्थी संख्या |
---|---|
सामूहिक शेततळे | १,८१५ |
शेततळी अस्तरीकरण | ४,०५५ |
फळबाग लागवड | २,११४ |
कांदा पॅकहाऊस | ४,००८ |
तुषार सिंचन | ४२,६८७ |
ठिबक सिंचन | १९,०२८ |
ट्रॅक्टर | ४२,८८३ |
शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी १० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर सादर करावीत. विहित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची निवड रद्द होऊ शकते.
कागदपत्र सादर करताना काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी थेट सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी आवाहन केले आहे.
शासनाची योजना; शेतकऱ्यांचा फायदा
राज्य शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामग्रीसाठी अनुदान दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावत असून, सिंचन क्षमता आणि उत्पादनवाढीतही सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
जालन्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी वर्ग या योजनांचा लाभ घेत असून, जिल्ह्यात शेतीच्या आधुनिकतेला चालना मिळत आहे.
'प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा' या तत्त्वावर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील दोन लाख ८२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर करावीत. - जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी