MahaDBT Agriculture Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे आणि यंत्रसामग्री सहज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना अधिक वेगाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.(MahaDBT Agriculture Scheme)
त्यानुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २३ जानेवारी रोजी जारी केला आहे.(MahaDBT Agriculture Scheme)
या योजनेंतर्गत सन २०२५-२६ साठी एकूण ४०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी या तरतुदीपैकी २०० कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आले होते.
उर्वरित निधीपैकी पहिल्या टप्प्यातील ५० कोटी रुपये कृषी आयुक्तालयास बीईएमएस (BEMS) प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निधीच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी अधिक गतिमान होणार आहे.
वैयक्तिक शेतकऱ्यांना थेट लाभ
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे व यंत्रे खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी व काढणीसाठीची यंत्रे, फवारणी उपकरणे यांसारखी आधुनिक साधने या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे शेतीतील श्रमखर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
महाडीबीटीवरून निवड, थेट खात्यात अनुदान
लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार असून, मंजूर अनुदानाची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राहणार असून, शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळणार आहे.
महिला व एससी–एसटी शेतकऱ्यांना प्राधान्य
या योजनेत महिला शेतकरी तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी विशेष भौतिक व आर्थिक उद्दिष्टे निश्चित करण्यात येणार आहेत.
यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत आधुनिक शेतीतंत्रज्ञान पोहोचण्यास हातभार लागणार आहे.
शेतीत आधुनिकतेला चालना
कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामे कमी वेळेत आणि अधिक कार्यक्षमतेने पूर्ण होतात. मनुष्यबळाची कमतरता, वाढता मजुरी खर्च आणि हवामानातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील शेती अधिक आधुनिक, उत्पादक आणि स्पर्धात्मक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Agriculture Scheme : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पोकरा आणि महाडीबीटी दोन्ही योजनांना आता समान अनुदान वाचा सविस्तर
