Magel Tyala Saur Krushi Pump Yojana :'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेत जिल्ह्यातील तब्बल ४१ हजार १२४ शेतकऱ्यांनी अर्ज करून शाश्वत सिंचनाची आशा धरली. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana)
त्यापैकी ३६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आपला आर्थिक हिस्सा महावितरणकडे जमा केला; मात्र प्रत्यक्षात केवळ २० हजार ४७३ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसविण्यात आले. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana)
उर्वरित हजारो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत असून त्यांच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे.(Magel Tyala Saur Krushi Pump Yojana)
सिंचनाअभावी उत्पादनात ५०% घट?
परभणी जिल्हा सुपीक जमिनीमुळे ओळखला जातो. २०२५ मध्ये पाऊसमान समाधानकारक राहिल्याने रब्बी हंगामात हरभरा आणि गहू मोठ्या प्रमाणावर पेरण्यात आले.
मात्र, वेळेवर सिंचनासाठी शाश्वत विजेची गरज असताना सौर पंप बसविण्यात झालेल्या विलंबामुळे अनेकांना पाणी असूनही पिकांना योग्य वेळी पाणी देता आले नाही.
शेतकऱ्यांचा दावा आहे की, यामुळे हरभरा आणि गव्हाच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली.
कंपन्यांची संथ गती, प्रशासनाचा कानाडोळा
योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पंधराहून अधिक कंपन्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र पंप बसविण्याची गती अत्यंत संथ असल्याची तक्रार आहे.
काही कंपन्या शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता थेट 'व्हेंडर सिलेक्शन' करत असल्याचेही आरोप आहेत.
यामुळे अपेक्षित कंपनी न मिळाल्यास शेतकरी संतप्त होऊन तक्रारी करत आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
अर्धवट साहित्य; शेतकरी त्रस्त
अनेक शेतकऱ्यांना पूर्ण संच मिळालेला नाही.
कुणाला पंप मिळाला नाही
कुणाला स्टार्टर देण्यात आलेला नाही
तर काहींना बोअरऐवजी विहिरीचे साहित्य देण्यात आले
यामुळे शेतकरी योजनेत सहभागी होऊनही लाभापासून वंचित राहत आहेत.
तालुकानिहाय बसविलेले पंप
गंगाखेड – १,२९३
पालम – १,३२९
परभणी ग्रामीण – ३,७१२
परभणी शहर – ३२
पूर्णा – २,२०८
जिंतूर – १,८४०
मानवत – २,२५४
पाथरी – ३,१९६
सेलू – ३,४६२
सोनपेठ – ९३३
एकूण २०,४७३ पंप बसविले गेले असून उर्वरित अर्जदारांना महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही संथ काम
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा जिल्हा परभणी असतानाही कामात अपेक्षित गती दिसत नसल्याची टीका होत आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने कंपन्यांवर नियंत्रण ठेवून उर्वरित पंपांची तातडीने बसवणी करावी.
शेतकऱ्यांची मागणी
* प्रलंबित अर्जांची तातडीने पूर्तता
* कंपन्यांच्या मनमानीवर अंकुश
* अर्धवट साहित्य पुरवठ्यावर कारवाई
* वेळेत सिंचनासाठी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करणे
* सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाचा महत्त्वाचा पर्याय मानली जाते.
मात्र, अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने तातडीने लक्ष घालून उर्वरित पंप बसविण्याची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
