फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलातून प्रति मेट्रिक टन ५० रुपये प्रमाणे करण्यात आलेल्या पूर्व हंगामी ठेव कपातीपैकी ५५ टक्के मुद्दल रक्कम शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
फैजपूर कारखान्याचा हा निर्णय २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीत कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना लागू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या ठेव रकमेबाबतचे पुरावे, पावत्या, बैंक पासबुकची प्रत तसेच आधार कार्डची प्रत कारखाना कार्यालयात सादर करावी.
तसेच, मृत शेतकऱ्यांच्या बाबतीत वारसदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे लागणार आहेत. यासाठी १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे व कार्यकारी संचालक रत्नदीप वायकोळे यांनी कळवले आहे.
'चोपडा'च्या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न लागला मार्गी
चोपडा साखर कारखान्यातील जवळपास ५५० कामगारांची भविष्य निर्वाह निधीच्या थकीत रकमेचा प्रश्न मार्गी लागला आहे. थकीत रकमेबाबत पाठपुराव्याअंती चोसाका कामगारांची थकीत रक्कम बारामती अॅग्रोच्या सहकार्याने देण्यास यश आले आहे. याबाबत साखर आयुक्त यांच्याकडे ३ कोटी रकमेचा डीडी जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी दिली आहे.
या ५५० कामगारांच्या ऑक्टोबर २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२१ या दरम्यान ५९ महिन्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम (पीएफ) ३ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम थकीत होती. यातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होऊन वर्षे उलटले मात्र त्यांना रुपयाही मिळाला नाही. यावर चोसाका संचालक मंडळाने बारामती अॅग्रोकडे रक्कम भरण्यासाठी तगादा लावला.
यासाठी प्रभारी कार्यकारी संचालक आधार पाटील यांनी प्रयत्न केले होते. कामगारांचा पीएफ वेतनातून कापला जाऊनही तो त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. आता या कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
