नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मुख्यालयातील कृषि विज्ञान केंद्रात (Nashik Krushi Vidnyan Kendra) ‘राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान’ अंतर्गत मधुमक्षिका पालन (Madhmashi Palan) या विषयावर सात दिवसीय मोफत निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०३ ते ०९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित या प्रशिक्षण शिबिरासाठी मर्यादित प्रवेश क्षमता आहे.
मधुमक्षिका पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि अन्नसुरक्षितेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत, मधुमक्षिकांच्या नैसर्गिक अधिवासांचा नाश, कीटकनाशकांचा अतिवापर, एक पीक पद्धत, हवामान बदल आणि विविध आजारांमुळे मधुमक्षिकांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. याचा थेट परिणाम अन्न साखळी व निसर्गावर होत आहे. त्यामुळे मधुमक्षिकांच्या योगदानाबाबत समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. या बाबींचा विचार करून केंद्र सरकारने ‘मधुमक्षिका साक्षरता’ अभियान राबविणे, मधुमक्षिका पालन व संवर्धन करणे हाती घेतले आहे.
काय-काय शिकवले जाईल?
त्यानुसार आयोजित या प्रशिक्षणामध्ये मधुमक्षिका पालनाचे मुलभूत ज्ञान व कौशल्य अवगत करणे, स्थलांतरित मधुमक्षिका पालन, पर्यावरणीय बदलाचे मधुमक्षिका पालनावरील परिणाम, ऋतूनुसार मधुमक्षिका पालन पध्दती, मध व मधुमक्षिकेच्या संबंधित उत्पादन प्रक्रियांची पद्धती, परागीभवन व शाश्वत शेतीमधील महत्व, रोग व शत्रूंची माहिती व त्यांची नियंत्रण पद्धती, त्याचबरोबर नामांकित मधुमक्षिका प्रकल्पाला भेट इत्यादी विषय – उपक्रमांचा समावेश आहे.
इथे साधा संपर्क
त्यामुळे इच्छुक शेतकरी, युवक- युवतींनी या मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व शिबीरात सहभागीता नावनोंदणीसाठी ऋषिकेश पवार यांच्याशी कार्यालयीन वेळेत व सुटीचा दिवस वगळता भ्रमणध्वनीवर (७३८५२७२४०९) संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले आहे.