नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्यातील अंतिम टप्प्यातील उन्हाळ कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. मात्र, आठवड्यातील तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने तसेच मजूर टंचाईमुळे ऐन रात्रीतही कडाक्याच्या थंडीत कांदा लागवड करण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
पुनंद खोऱ्यासह रवळजी, देसराणे, मोकभणगी परिसरात तसेच कळवण तालुक्यात परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे कांदा रोपे उशिरा लागवडीला आली. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात होणारी कांदा लागवड यंदा मात्र दोन महिने लांबणीवर आल्याने सर्वच शेतकऱ्यांची शेतात टाकलेली कांदा रोपे लागवडीला आली आहेत. मात्र शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा फटका बसत असून, शेतात रात्रीच्या सुमारास काम करावे लागत आहे.
रात्रीच्या वेळेस वीज असलेल्या दिवशी अनेक शेतकरी शेतात विजेची व्यवस्था करत कांदा लागवड करत आहेत. ज्या दिवशी दिवसा वीज राहते, त्या दिवशी मजूर इतरत्र कामाचा ठेका (मक्ता) घेतलेल्या ठिकाणी कामाला जातात. त्यामुळे मजूर रात्रीच्या वेळी कांदा लागवडीला जुमानत नाहीत. विजेअभावी अधिकची मजुरी देत लागवड उरकावी लागते. कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
रात्रीचा अंधार आणि त्यातच बिबट्याची भीती अशा वातावरणात शेतकरी आणि मजुरांना काम करावे लागत आहे. सध्या शेती अनिश्चिततेची झालेली असतांनाच जीवावर उदार होऊन शेती करावी लागत आहे. शेतीसाठी चोवीस तास वीजपुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याच्या शेती उत्पादनावरही परिणाम होतो.
भारनियमनाची चुकीची वेळ कांदा लागवडीसाठी अडचणीची ठरत आहे. महागडी कांदा रोपे, तसेच मजूर टंचाई यामुळे सर्वच बाजूने शेतक-यांची पिळवणूकच होत आहे. विजेच्या भारनियमनामुळे मजुरांना अधिकची मजुरी देऊन रात्रीची कांदा लागवड केली. किमान कांदा लागवडीपासून ते शेतातून कांदा काढणीपर्यंत या चार महिने कालावधीत दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेवून शेतकरी हिताचे धोरण कंपनीने राबविणे गरजेचे आहे.
- सोपान पवार, शेतकरी, मोकभणगी
