रऊफ शेख
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे श्रम आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेला फुलंब्री तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Krushi Yantrikaran Yojana)
मात्र, यंत्र खरेदी करूनही शेकडो शेतकरी आजही अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. (Krushi Yantrikaran Yojana)
तालुक्यात १० हजार ३३८ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक अर्ज असल्यामुळे २६५ अर्ज रद्द करण्यात आले. उर्वरित अर्जांपैकी १ हजार ४३५ शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली असून, त्यातील ६२३ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष यंत्रांची खरेदी पूर्ण केली आहे. (Krushi Yantrikaran Yojana)
४७६ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले
खरेदी करण्यात आलेल्या यंत्रांपैकी ४७६ शेतकऱ्यांच्या यंत्रांची प्रत्यक्ष तपासणी (व्हेरिफिकेशन) पूर्ण झाली आहे. असे असतानाही आतापर्यंत फक्त ८४ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
उर्वरित ४७६ शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. यंत्र खरेदीसाठी स्वतःचा निधी किंवा कर्ज वापरलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.
काय आहे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना?
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी कृषी यांत्रिकीकरण योजना ही शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वाची योजना मानली जाते.
या योजनेंतर्गत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, पॉवर टिलर, फवारणी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र यांसारख्या आधुनिक कृषी अवजारांच्या खरेदीवर ४० ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
ट्रॅक्टरसाठी कमाल सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते. अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन केली जाते.
यंत्रांमुळे शेती कामांना गती, मात्र अनुदानाची प्रतीक्षा कायम
आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे पेरणी, फवारणी आणि काढणीची कामे वेळेत पूर्ण होत असून मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेत न मिळाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लाभ देण्यासाठी प्रयत्नशील
आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे शेती अधिक कार्यक्षम झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. प्रलंबित अनुदानाचा निधी लवकरच प्राप्त होईल. - पंकज वाळके, तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री
आकडेवारी एका नजरेत
१०,३३८ शेतकऱ्यांनी अर्ज केला
१,४३५ शेतकऱ्यांना पूर्वसंमती
६२३ शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी
४७६ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित
८४ शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदान
सुमारे ५ कोटी रुपये निधी रखडलेला
