Krushi Puraskar : शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, गट आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. (Krushi Puraskar)
सन २०२५ पासूनच्या पुरस्कारांसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.(Krushi Puraskar)
महाराष्ट्र हे कृषी उत्पादनात देशातील आघाडीचे राज्य मानले जाते. या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून विविध प्रतिष्ठेचे कृषी पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचे वितरण प्रामुख्याने राज्यपालांच्या हस्ते केले जाते.(Krushi Puraskar)
यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, उद्यानपंडित, युवा शेतकरी पुरस्कार तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचा समावेश असतो.(Krushi Puraskar)
आता अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन
यापूर्वी कृषी पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागत होते. त्यामुळे अर्जदारांना छपाई, झेरॉक्स, टपाल आणि प्रवासासाठी मोठा खर्च करावा लागत असे. तसेच प्रस्तावांची पडताळणी आणि संकलन करताना प्रशासनाचाही मोठा वेळ खर्च होत होता.
ही अडचण दूर करण्यासाठी कृषी विभागाने आता स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली असून, प्रस्ताव सादर करण्यापासून ते मूल्यांकन आणि अहवाल तयार करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.
कुठे आणि कसा करायचा अर्ज?
इच्छुक शेतकरी किंवा संस्था कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
संकेतस्थळ : krishi.maharashtra.gov.in
येथे 'कृषी पुरस्कार' या टॅबवर क्लिक करून आवश्यक माहिती भरून प्रस्ताव सादर करता येणार आहे.
ऑनलाइन प्रणालीचे शेतकऱ्यांना फायदे
* नव्या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनेक सोयी मिळणार आहेत.
* शेतकऱ्यांना कार्यालयात जाण्याची गरज न पडता घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
* छपाई, झेरॉक्स, टपाल आणि प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
* एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही.
* अर्ज सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहे.
या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पुरस्कार प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी, गट आणि संस्थांनी या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.
कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या घटकांना राज्यस्तरीय सन्मान मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा :Pashupalan Yojana : ग्रामीण तरुणांसाठी गेमचेंजर ठरतेय पशुपालन योजना; जाणून घ्या सविस्तर
