धुळे : कृषीपंप तत्काळ (Krushi Pump) सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहक ऑटोस्वीच बसवतात. त्यामुळे परिसरातील सर्व कृषीपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते.
यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषि पंपांना ऑटोस्तीचऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने (Mahavitaran) केले आहे.
प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवणे, हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
ऑटोस्वीचचा वापर टाळा
महावितरणकडून कृषिपंपांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषीपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी काही ठिकाणी शेतकरी कृषिपंपांना 'ऑटोस्वीच' लावतात. त्यामुळे वीज येताच कृषीपंप आपोआप चालू होतो. 
परिणामी, रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवून ऑटोस्वीचचा वापर टाळावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
काहींचे बंद तर काहींनी थेट कॅपॅसिटर बसविलेल्यांपैकी जोडणी केली असल्याने कॅपॅसिटर बसविले नाहीत. तसेच कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कृषिपंपास कॅपॅसिटरमुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते.
