Krushi Pump Capacitor : रब्बी हंगामाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात शेतीसाठी वीज वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि रोहित्रांवरील अचानक भार टाळण्यासाठी महावितरण अकोला परिमंडळाने शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी 'ऑटोस्विच'चा वापर टाळण्याचे तसेच योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसवण्याचे आवाहन केले आहे. (Krushi Pump Capacitor)
ऑटोस्विच धोकादायक?
काही शेतकरी वीजपुरवठा सुरू होताच कृषिपंप आपोआप सुरू व्हावा म्हणून 'ऑटोस्विच' लावतात. मात्र यामुळे परिसरातील सर्व पंप एकाच वेळी सुरू होतात त्यामुळे रोहित्रावरचा भार अचानक वाढतो. (Krushi Pump Capacitor)
रोहित्र जळणे, वीजवाहिन्या ट्रिप होणे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक गावांना वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
महावितरणने स्पष्ट केले की, ऑटोस्विचचा वाढता वापर हा रोहित्रांवर ताण वाढण्याचे आणि हंगामात अडचणी उद्भवण्याचे प्रमुख कारण बनत आहे.
कॅपॅसिटर लावल्याचे फायदे काय?
महावितरणनुसार, कृषिपंपांना क्षमतेनुसार योग्य कॅपॅसिटर बसवल्यास खालील महत्त्वाचे फायदे होतात:
* रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी
* कॅपॅसिटरमुळे सुरूवातीचा विद्युत भार कमी होतो, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवरील ताण घटतो.
* वीज दाब स्थिर राहतो
* योग्य व्होल्टेज मिळाल्याने पंप सुरळीत, कार्यक्षम आणि दीर्घकाळ चालतो.
* वीज केबल जळण्याचे प्रमाण कमी
* आकस्मिक भार न पडल्याने केबल्स सुरक्षित राहतात.
* वीज वापरात बचत
* कॅपॅसिटरमुळे वीज वापर कार्यक्षम राहतो.
* शेतीपंपाची कार्यक्षमता वाढते
महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन
दिवसा आणि रात्रीच्या चक्राकार वीजपुरवठ्यामुळे काही भागात शेतकरी ऑटोस्विच वापरतात, परंतु यामुळे संपूर्ण परिसरातील विद्युतव्यवस्था कोलमडण्याचा धोका वाढतो.
'रब्बी हंगामात रोहित्र बिघाडामुळे अडचण येऊ नये, शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी यासाठी ऑटोस्विच बंद करून कॅपॅसिटर बसवणे आवश्यक आहे,' असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
