छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या खरीप हंगामावर 'एल निनो'चा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Kharif Season)
प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढल्याने जागतिक हवामानात बदल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्याचा परिणाम भारतातील मान्सूनवर होण्याची शक्यता असून यंदा पाऊस कमी पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.(Kharif Season)
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने ॲक्शन मोडमध्ये येत शेतकऱ्यांना पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन सुरू केले आहे. (Kharif Season)
एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र पिके, आंतरपिके आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचा पर्याय स्वीकारावा, असा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी दिला आहे.(Kharif Season)
एल निनो म्हणजे काय?
एल निनो ही प्रशांत महासागरातील हवामानाशी संबंधित नैसर्गिक प्रक्रिया आहे. महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने जगभरातील हवामान चक्रावर परिणाम होतो.
भारतात विशेषतः याचा परिणाम मान्सूनवर होतो. एल निनो सक्रिय झाल्यास पावसाचे प्रमाण कमी होणे, उष्णतेत वाढ आणि दीर्घकाळ कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असते.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेती उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने मागील महिन्यापासूनच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.
विभागातील अधिकारी गावोगावी भेटी देत आहेत. तसेच ऑनलाइन बैठका घेऊन शेतकऱ्यांना पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि पर्यायी शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
पावसाने खंड दिल्यास किंवा पाऊस उशिरा झाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पारंपरिक पिकांऐवजी कमी पाण्यात तग धरणाऱ्या पिकांकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिश्र पिके आणि आंतरपीक पद्धतीवर भर
कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे. कमी पाऊस झाल्यास संपूर्ण पीक धोक्यात येऊ नये यासाठी मिश्र पिके आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.
विशेषतः ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आणि तीळ यांसारखी कमी पाण्यावर येणारी पिके घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पिकांना कमी पाणी लागते आणि कोरडवाहू परिस्थितीतही तुलनेने चांगले उत्पादन मिळू शकते.
पाणी बचतीला प्राधान्य
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन कृषी विभागाने पाणी बचतीवर विशेष भर दिला आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
* शेततळे तयार करणे
* बांधबांधणी करणे
* गाळकूप उभारणे
* पावसाचे पाणी साठवणे
या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने यंदा अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
संतुलित खत व्यवस्थापनाचा सल्ला
कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सेंद्रिय खत, शेणखत आणि जीवामृताचा वापर वाढवावा, तसेच रासायनिक खतांचा अतिरेक टाळावा, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.
विशेषतः नायट्रोजनयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संतुलित खत व्यवस्थापनामुळे पिकांची वाढ चांगली राहण्यास मदत होते.
उत्पादन घटण्याची भीती
उष्णतेत वाढ, कमी पाऊस आणि कोरडे वारे यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेआधीच योग्य पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
'कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मिश्र पिके, आंतरपिके आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचा पर्याय स्वीकारावा. तसेच पाणी बचत आणि संतुलित खत व्यवस्थापनावर भर द्यावा,' असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Kharif Season : सरकारचा मोठा प्लॅन! शेतकऱ्यांसाठी अधिकारी पोहोचणार थेट बांधावर
अधिक वाचा : Cotton Farming : कापूस लागवडीवर संकट! उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
