Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) वतीने वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेत आतापर्यंत ७ हजार १६४ शेतकऱ्यांकडील एकूण १ लाख ३७ हजार ६८२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.(Kapus Kharedi)
मात्र, खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या २ हजार २४६ शेतकऱ्यांची नोंदणी विविध निकष पूर्ण न झाल्यामुळे रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.(Kapus Kharedi)
जिल्ह्यात मानोरा, मंगरुळपीर, कारंजा व वाशिम या चार ठिकाणी सीसीआयचे खरेदी केंद्र कार्यरत आहेत. यासाठी एकूण १४,६९८ शेतकऱ्यांनी 'कपास किसान ॲप'वर नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ३८९ शेतकऱ्यांना खरेदीसाठी मंजुरी (Approval) देण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप मंजुरीची प्रतीक्षा आहे.
खासगी व्यापाऱ्यांऐवजी शासकीय खरेदीकडे कल
साधारणपणे खरीप हंगामात जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के कापूस खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जातो. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी दिसून येत आहे.
हमीभावाच्या खात्रीशीर दरामुळे शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांपेक्षा सीसीआयकडे अधिक वाढलेला पाहायला मिळाला. परिणामी, व्यापाऱ्यांकडे कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिलेल्या नाहीत.
केंद्रनिहाय कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)
मानोरा : ३३,६०३.२५
मंगरुळपीर : २४,३३०.६०
कारंजा : ५४,१९०.४०
वाशिम : २५,५५७.९५
सीसीआय केंद्रांवर शुकशुकाट
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीसीआय केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या.
मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून खुल्या बाजारात दर वाढल्याने शेतकऱ्यांनी खासगी बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सध्या सीसीआय केंद्रांवर शुकशुकाट जाणवत आहे.
खुल्या बाजारात दरात वाढ
सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाच्या पुढील विक्रीला विलंब होत असल्याने खुल्या बाजारात कापसाच्या दरात तेजी आली आहे.
सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल ८ हजार ३४० रुपयांपर्यंत पोहोचले असून हे दर हमीभावापेक्षा सुमारे ३३० रुपयांनी अधिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विक्री अधिक फायदेशीर ठरत आहे. मात्र, याचा फटका खासगी व्यापाऱ्यांना बसल्याचे बोलले जात आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा खरेदी कमी
गतवर्षी सीसीआयच्या माध्यमातून जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ हजार ६८२ शेतकऱ्यांकडील १ लाख ४९ हजार ८६९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा कापूस खरेदीचे प्रमाण कमी राहिले आहे.
यंदाच्या हंगामात शासकीय व खासगी बाजारातील दरातील चढ-उतार, नोंदणी रद्द होण्याचे प्रकार आणि खरेदी प्रक्रियेतील विलंब यामुळे कापूस बाजारात संमिश्र चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : शासकीय केंद्रांवर आवक का कोसळली? काय आहे कारण वाचा सविस्तर
