नाशिक : सर्वसाधारणपणे आठ हजार रुपये पायलीने विकत घेतलेले महागडे बियाणे आज रोपांच्या स्वरूपात तब्बल २५ ते ३० हजार रुपये पायलीपर्यंत पोहोचले आहेत, तरीही रोपे मिळत नाहीत. एका वाफ्याची किंमत २ ते ३ हजार रुपयांपर्यंत गेली आहे. परिणामी कांद्याच्या रोपांना 'सोन्याचा भाव' आला असून, शेतकरी रोपांच्या प्रतीक्षेत आहेत.
परतीच्या महिन्यात झालेल्या पावसामुळे खामखेडा परिसरातील उन्हाळ, रांगडा कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कांद्याच्या रोपांना आता अक्षरशः सोन्याचा भाव आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी उन्हाळ व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. काही रोपे उगवली असतानाच ऑक्टोबरच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यामुळे उगवलेल्या कोवळ्या रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला, तर नव्याने टाकलेली बियाणे जागीच दबले. यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा जमीन तयार करून उरलेले बियाणे टाकले. परंतु अवकाळी पावसाने पुन्हा पंधरा दिवस जोरदार बरसात केल्याने वाफ्यांमध्ये पाणी साचून रोपांचे मूळ सडले आणि बहुतेक सर्व रोपे नष्ट झाली.
हेक्टरी उत्पादन घटले
गेल्या महिन्यात दिवाळी दरम्यान दहा-बारा दिवस झालेल्या संततधार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीत बियाणे टाकून रोपे तयार केली असून, ती आता लागवडीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकरी कांद्याच्या रोपांचा शोध घेत फिरताना दिसत आहेत. जे क्षेत्र दरवर्षी पाच ते सहा ट्रॅक्टर कांदा देत होते, तेथे यंदा फक्त १५ ते २० क्विंटल उत्पादन निघत आहे. त्यालाही अनुरूप भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
