नाशिक : ज्वारीची भाकरी, महाराष्ट्राची एक पारंपरिक आणि आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे. ज्वारीच्या पिठापासून बनवलेली ही भाकरी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये रोजच्या जेवणाचा भाग आहे.
ज्वारीची भाकरी खाणे एक आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय आहे. त्यामुळे आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करणे फायद्याचे ठरते.
असेही महत्त्वाचे फायदे ज्वारीचे
कमी कॅलरीज, पचनक्रिया सुधारते :
ज्वारीची भाकरी गव्हाच्या तुलनेत कमी कॅलरीजची असते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
ज्वारी पचनास मदत करते आणि त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे वजन कमी होते.
रक्तातील साखर नियंत्रित :
ज्वारी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
पोषण आणि आरोग्य : ज्वारीमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्त्वे आणि जीवनसत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी चांगली असतात. ज्वारीमुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
ज्वारी फायद्याची; फायबर जास्त
वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे खूप फायदेशीर आहे. ज्वारीमध्ये फायबर जास्त असल्याने, ती खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टाळता येते.
यंदा भाववाढीचा अंदाज
ज्वारीला वाढती मागणी तसेच जिल्ह्यात कमी झालेला ज्वारीचा पेरा पाहता यंदा ज्वारीचे भाव वाढलेले असतील. ४५ रुपयांहून अधिक भाव होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात एकदातरी ज्वारीची भाकरी खाल्ली जात असल्याने ज्वारीला मागणी वाढली आहे.
ज्वारी विविध आरोग्य फायदे देते. यात मधुमेह, स्थूलपणा, कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. ज्वारीत फिनोलिक संयुगे आणि चरबी विरघळणारे संयुगे असतात. ही संयुगे लठ्ठपणा, ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ व उच्च रक्तदाबाचा धोका कमी करतात. दिवसातून एकदा तरी ज्वारीची भाकरी खावीच.
- रश्मी सोमानी, आहारतज्ज्ञ, नाशिक