Jowar Sowing : खरीपातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी बळीराजा हार मानलेला नाही. आता रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. (Jowar Sowing)
योग्य ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे शेतकरी नव्या उत्साहाने पेरणी करत आहेत. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
मात्र, आता त्या नुकसानीचे दुःख मागे सारत बळीराजा नव्या उत्साहाने रब्बी हंगामाला सुरुवात करत आहे.
सध्या परिसरात ज्वारी पिकाच्या पेरणीची लगबग सुरू झाली असून, योग्य ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे हीच योग्य वेळ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ट्रॅक्टरच्या सहाय्याने झपाट्याने कामे
पूर्वी ज्वारी पेरणीसाठी बैलजोडी आणि तिफणीचा वापर होत असे. मात्र आता यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने झपाट्याने पेरणीची कामे पूर्ण होत आहेत. अनेक शेतकरी पहाटे सूर्योदयाआधीच ट्रॅक्टर घेऊन शेतात जातात आणि रात्री उशिरा घरी परततात.
खत-बियाण्यांच्या मागणीत वाढ
रब्बी हंगामाची तयारी सुरू होताच कृषी दुकाने गर्दीने फुलली आहेत. खत, बियाणे आणि शेती अवजारे खरेदीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने दुकानदारांकडे रांगा लावत आहेत.
अनेक ठिकाणी एकाच वेळी नांगरणी, पेरणी आणि मोगडाची कामे केली जात असल्याने शेतातील हालचाल वाढली आहे.
हवामान आणि पिकासाठी योग्य वेळ
कृषी तज्ञांच्या मते, सध्या मातीतील ओलावा योग्य प्रमाणात असून तापमान ज्वारी पिकासाठी अनुकूल आहे. पुढील ८–१० दिवसांमध्ये पेरणी पूर्ण झाली तर उत्पादन समाधानकारक मिळण्याची शक्यता आहे.
खरीपातील नुकसानानंतर शेतकरी पुन्हा सावरत आहेत. 'रब्बी' हंगामात ज्वारी पिकावर बळीराजाचा पूर्ण विश्वास आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने झपाट्याने चालणारी पेरणी ही बदलत्या शेती संस्कृतीचे उदाहरण ठरत आहे.
बैलजोडी आणि तिफणीऐवजी आता ट्रॅक्टरच्या साह्याने झटपट पेरणीची कामे उरकून घेतली जात आहेत. खरिपात मोठे नुकसान झाले, त्यामुळे रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. - अमोल भोजने, शेतकरी
जमिनीतील योग्य ओलावा आणि चांगले वातावरण असल्याने ज्वारी पेरणीसाठी हीच योग्य वेळ आहे. वेळ आणि मजुरी वाचवण्यासाठी ट्रॅक्टरला प्राधान्य देत आहे. - नंदकुमार बुखार, शेतकरी
सकाळी सूर्योदयापूर्वी पेरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन निघतो, ते रात्रीच घरी पोहोचतो. आधीच पावसामुळे पेरणीला उशीर झालेला असल्याने शेतकरी वेळेत पेरणी व्हावी म्हणून ट्रॅक्टरला प्राधान्य देत आहेत. सध्या दिवसातून ५ ते ६ शेतकऱ्यांकडे पेरणीची कामे करत आहे. - लक्ष्मण दुधारे व विशाल महिपाल, ट्रॅक्टरचालक
