Jivant Satbara Mohim : शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीत पारदर्शकता व अचूकता यावी यासाठी सुरू केलेली 'जिवंत सात-बारा' मोहीम (Jivant Satbara Mohim) आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. या टप्प्यात जुन्या व कालबाह्य नोंदी हटवून सात-बारा उतारे अद्ययावत केले जातील.
परिणामी, शेतकऱ्यांना जमिनीशी संबंधित व्यवहार करताना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मालमत्तेचे वास्तव चित्र सात-बारा उताऱ्यावर प्रतिबिंबित व्हावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली जिवंत सात-बारा मोहीम आता अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबवली जाणार आहे.(Jivant Satbara Mohim)
या मोहिमेचा दुसरा टप्पा शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आला असून, कालबाह्य नोंदी हटवून उतारे अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे.(Jivant Satbara Mohim)
ही अभिनव मोहीम चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली होती. प्रथम चिखली तालुक्यात आणि त्यानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली.(Jivant Satbara Mohim)
यानंतर जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाभर राबविलेली मोहीम आता राज्यभर लागू करण्यात आली आहे.
आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्यानंतर महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाला सकारात्मक पाठबळ दिले. याला मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात मान्यता मिळाली आणि त्यामुळे राज्यात सर्वत्र ही मोहीम प्रभावीपणे अमलात आली.
काय आहे टप्पा क्रमांक २?
* जिवंत सात-बारा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सात-बारावरील अपाक शेरा, तगाई कर्ज, बंडींग बोजे, नजर गहाण, सावकारी कर्ज, भूसंपादन निवाडा, बिनशेती आदेश, पोटखराब क्षेत्र, महिला वारस नोंदी आदी कालबाह्य व अकार्यक्षम नोंदी हटविण्यात येणार आहेत.
* यासोबतच वारसांची नोंद, जमिनीचे स्वामित्व, भूगोलानुसार भोगवट्याचे स्वरूप तसेच स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक मालकीच्या जमिनींची नोंद अधिकृत अभिलेखात समाविष्ट केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना काय होणार फायदा?
* या मोहिमेमुळे सात-बारावरून जुन्या, निरुपयोगी नोंदी दूर होतील. परिणामी, शेतकऱ्यांना कर्जप्रकरणे, जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार तसेच शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर होतील.
* तलाठ्यांना फेरफार नोंदी संकलित करून जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
* तालुका व मंडळ स्तरावर विशेष कॅम्प घेऊन ही कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी सर्व तहसीलदारांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
हे ही वाचा सविस्तर: Satbara Mohim : बुलढाणा जिल्ह्यात 'जिवंत सातबारा मोहीम' जाणून घ्या सविस्तर