चंद्रपूर : हवामान बदल, अतिवृष्टी आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी सकारात्मक बाब वरोरा तालुक्यात घडली आहे. शेगांव (बु) परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा हवामान अनुकूल व पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब करत रसायनमुक्त जवस शेतीचा आदर्श निर्माण केला असून २०० एकरावर जवस फुलणार आहे.
वरिष्ठ जवस पैदासकार डॉ. बिना नायर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात शेगाव मंडळातील ११० एकरांवर प्रात्यक्षिके राबविण्यात आली. तालुक्यातील अनेक गावांत ही लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचा संशोधित जवस वाण पी. के. व्ही. एन. एल. २६० तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पांढऱ्या फुलांचा वाण एल. एस. एल. ९३ सेंद्रिय व जैविक पद्धतीने लागवड केला. परिणामी, वरोरा तालुक्यात जवस लागवडीचे क्षेत्र २०० एकरांहून अधिक वाढविण्यात कृषी विभागाला यश आले आहे.
मेळाव्यात दिले बियाणे
सोयाबीन, कापूस आणि भात पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर शेतकरी पुन्हा पारंपरिक तेलबिया पिकांकडे वळले. जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषि महाविद्यालय नागपूर येथील वरिष्ठ जवस पैदासकार डॉ. बिना नायर यांच्या मुख्य मार्गदर्शनात शेगांव मंडळातील चारगाव बु. मेळावा आयोजित करून परिसरातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते.
प्रति एकर सहा क्विंटल उत्पादनाचा अंदाज
प्रगतिशील शेतकरी संदीप थुल यांच्या मते उत्पादन ५ ते ६ क्विंटल प्रती एकर अपेक्षित आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून शेतकरी उत्पादक कंपनीला स्वयंचलित तेलघाणी उपलब्ध झाल्याने गटाच्या माध्यमातून जवस तेल निर्मिती व विक्रीचा मानस शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्प संचालक आत्मा अरुण कुसळकर, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिनखेडे, कृषी अधिकारी रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात कृषी अधिकारी विजय का जवस लागवड क्षेत्र वाढत आहे.
