Jalgaon Banana : केळी उत्पादनात जगात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या जळगावच्याकेळीचा (Jalgaon Banana) केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन क्षेत्र विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तामिळनाडूमधील केळीचा (Tamilnadu Banana) समावेश करण्यात आला होता. आता जळगावमधीलकेळीचाही समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या फलोत्पादन (Fruit Farming) क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (NHB) क्लस्टर विकास कार्यक्रम (CDP) अंतर्गत ५३ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, पश्चात-हानी व्यवस्थापन सुधारणे, आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या ५३ क्लस्टरपैकी जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले गेले आहे.
जळगांव जिल्ह्यामध्ये मुख्य पिक म्हणून केळीची शेती केली जाते आणि रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये केळी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. केळी उत्पादनाच्या बाबतीत हा रावेर लोकसभा मतदारसंघ देशातील सर्वात मोठा पुरवठादार आहे. तसेच, रावेर लोकसभा मतदारसंघातील केळीची मागणी शेजारील देशांमध्ये जसे की इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबई, बहरीन, अझरबैजान आणि कुवैतमध्ये वाढत आहे. परिणामी, या देशांमध्ये केळीचा नियमित निर्यात व्यापार स्थापन झाला असून, सध्याच्या परिस्थितीत तो आणखी वाढत आहे.
असे होतील फायदे
केळीला क्लस्टर मिळाल्यामुळे शेतमाल वाहतूक करण्यासाठी, केळीच्या कोल्ड स्टोअरेज, वेअर हाऊसमध्ये साठवणुकीसाठी अनुदान मिळणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, शेतकरी गट या संस्था पात्र ठरल्या आहेत. केळीची साठवणूक करायची आहे, त्यांना कोल्ड स्टोअरेजमध्ये केळी ठेवण्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाईल.
आगामी काही महिन्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात माती परीक्षणासाठी हायटेक लॅब तयार करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. यासह शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न ही राहणार आहे.
PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? अशी पहा जिल्हावार संपर्क यादी