जळगाव : शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देऊन ओळख निर्माण करण्याचा महसूल विभागाने निर्णय घेतला आहे. या क्रमांकामुळे रस्त्यांची नोंदणी सोपी होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होईल.
तसेच अरुंद शेत रस्ते रुंद करण्याची योजना आणली आहे. गावनिहाय रस्त्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शिवार फेरी काढण्याचे निर्देशही महसूल विभागाने दिले आहेत.
महसूल विभागाने या रस्त्यांना ओळख निर्माण करण्यासाठी आदेश काढले आहेत. महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना महसूल शेतकरी व कृषी विकासाच्या दृष्टीने सुसूत्र विभागाने शेतरस्त्यांच्या व्यवस्थापनासाठी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
यानुसार सर्व शेतरस्त्यांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक शेतरस्त्याला एक निश्चित क्रमांक दिला जाईल, ज्यामुळे त्या रस्त्याची ओळख स्पष्ट होईल.
शेतकऱ्यांना असे होणार फायदे
१) प्रत्येक शेतरस्त्याची ओळख निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण सोपे होणार
२) रस्त्यांचे सीमांकन झाल्यामुळे जमिनीशी संबंधित वाद कमी होतील
३) आधुनिक यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे अधिक सुलभ होईल
४) डिजिटल नकाशांवर सुस्पष्टता येईल
५) अडचणीचे ठरणारे अतिक्रमण काढले जाईल.
रस्त्यांची यादी तयार होणार
प्रत्येक गावातील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), महसूल सेवक (कोतवाल) व पोलिस पाटील यांनी सामूहिकपणे रस्त्यांची यादी तयार करावी लागणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामस्थांच्या मदतीने शिवार फेरी काढली जाणार आहे.
सीमांकन करणार
भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने या रस्त्यांचे सीमांकन केले जाणार आहे. तहसीलदारांकडून रस्त्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई देखील याच विभागाकडून केली जाणार आहे.