नंदुरबार : सुजालपूर, ता. नंदुरबार येथील प्रयोगशील शेतकरी डॉ. संकेत सुनील पाटील यांनी आपल्या शेतात 'इलायची' केळी (Ilayachi Banana) या नवीन वाणाची तीन एकर क्षेत्रात लागवड करून हा प्रयोग यशस्वी केला आहे.
डॉ. संकेत पाटील यांनी तीन एकर इलायची केळी लागवड (Banana Farming) केली असून, या केळीचे वैशिष्ट्य असे की, ती चवीला गोड, भरपूर प्रथिने युक्त व आरोग्याच्या मानाने पौष्टीक आहे. या केळीला मोठ्या शहरातील बाजारपेठेत भरपूर मागणी असून, त्यांनी या केळी लागवडीबद्दल आणि विक्रीबद्दल कर्नाटक आणि सोलापूर येथे जाऊन अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
या केळीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जिल्ह्यातील जमिनीत चांगले उत्पन्न येणे किंवा पिकणे शक्य नाही, तरीदेखील डॉ. पाटील यांनी तीन एकर क्षेत्रात तिची लागवड करून उत्पन्न घेत आहेत. त्यांनी आपली इलायची केळी ही स्वतः नामांकित कंपनीशी संपर्क करून स्वतः आपली इलायची केळी विक्री केली आहे. या केळीला इतर केळीपेक्षा भाव जास्त असून, त्यांनी आपल्या थेट शेताच्या बांधावरूनच कंपनीला माल पुरवला आहे.
विशेष म्हणजे केळीच्या बागेची पाहणी करण्यासाठी जिल्हाभरातील अनेक शेतकरी भेट देत असून, इलायची केळी लागवडीसंदर्भात मार्गदर्शन घेत आहेत. डॉ. पाटील व सुनील शिवदास पाटील यांनी आपल्या पिकाचा दर्जा राखत एक नव्या उंचीवर त्याला नेल्याने त्यांनी केलेल्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.
झाडाची उंची २० ते २२ फुटापर्यंत
डॉ. संकेत पाटील यांनी सुजालपूर शिवारातील आपल्या शेतात इलायची केळीची लागवड फेब्रुवारी २०२४ मध्ये केली होती. केळीची सरासरी उंची ही २० ते २२ फूट पर्यंत वाढते. विशेष म्हणजे या केळीचा घड हा आडव्या पद्धतीने निघतो. एका घडाचे वजन सरासरी १५ ते १७ किलोग्रॅमपर्यंत भरते. इलायची केळीला सरासरी बाजारभाव ३५ ते ४५ रुपये किलोपर्यंत मिळतो.