जळगाव : ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकीदारांच्या विरोधात 'ऑटो डिस्कनेक्शन' मोहीम सुरू केली आहे. यामुळे थकीत वीजबिल भरायला विलंब करणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा 'स्मार्ट मीटर'च्या माध्यमातून रिमोट पद्धतीने खंडित केला जात आहे.
मुंबईतील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, दि. २० फेब्रुवारीपासून रिमोट ऑपरेशन मोहीम राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर अंमलात आणण्यात आली आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी थकबाकीची रक्कम निश्चित कालावधीत भरली नाही तर, संगणक प्रणालीद्वारे वीज जोडणी बंद केली जात आहे. दरम्यान, जळगाव शहरात १ लाख ५७ हजार ७७ स्मार्ट मीटर बसवायचे असून, त्यापैकी ८६ हजार ६२७ बसवून झाले आहेत.
प्रणाली कशी काम करते ?
स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये थकित बिलाची नोंद होताच संबंधित ग्राहकाला एसएमएसद्वारे सूचना दिली जाते. बिलाची अंतिम मुदत उलटल्यानंतरही रक्कम न भरल्यास प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित केला जातो. तशी यंत्रणा त्यात बसविण्यात आली आहे. थकबाकी भरल्यानंतर रिमोट पद्धतीने पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जातो. या प्रणालीमुळे मनुष्यबळाया वेळ व श्रम वाचणार असून, थकबाकी नियंत्रणात येण्यास मदत होणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
छेडछाड सापडणार
स्मार्ट मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट आहे. त्यामुळे या मीटरमध्ये छेडछाडीचे प्रकार (टॅम्परिंग इव्हेंट) घडल्यास त्याची माहिती लागलीच महावितरणच्या सर्व्हरला कळते. या सर्व्हरवर २४ तास लक्ष ठेवले जाते. या तंत्रज्ञानामुळे वीज चोरांना चाप बसण्यास मदत झाली आहे. वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्मार्ट मीटर ही आधुनिक प्रणाली असून, अचूक बिलिंगमुळे ग्राहक आणि महावितरण दोघांनाही फायदा होणार आहे. दिवसाच्या वीज वापरावर घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
- ज्ञानेश्वर अर्दाड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
