अकोला : विदर्भातीलसोयाबीन पिकावर (soyabean Kid) खोड माशी आणि चक्री भुंगा किडींचा प्रकोप वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान वाढण्याआधीच योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आवाहन केले आहे.
विदर्भात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची (Soyabean farming) करण्यात आली आहे. सोयाबीन पिकावर सध्या ज्याठिकाणी बीज प्रक्रिया केलेली नाही, त्याठिकाणी या पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
किडीची ओळख व नुकसान
खोड माशी : लहान, चमकदार काळ्या रंगाची असून, त्यांची लांबी २ मिमी असते.
अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिकट पिवळ्या रंगाची, २-४ मिमी लांब असते.
ही अळी पानाच्या शिरेला छिद्र करते.
अळीनंतर पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते.
झाडावरील फुलांची गळ होते व शेंगांतील दाण्यांचे वजन कमी होऊन उत्पादनात १६-३० टक्के घट होते.
चक्री भुंगा : चक्री भुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एकमेकांपासून १ ते १.५ से.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल कापा तयार करून चक्री भुंग्याची अळी त्यामध्ये अंडी टाकते.
त्यामुळे चक्र कापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ अणि फांदीतून आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरते.
या किडीचा प्रादुर्भाव मूग, उडीद, चवळी या पिकांवर सुद्धा होऊ शकतो.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो.
हे फायदेशीर उपाय करा
- किडग्रस्त पाने नष्ट करावीत
- किडीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतीचे बांध स्वच्छ ठेवावे.
- बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतींचा नाश करावा.
- अंडी, अळी असलेली पाने काढून नष्ट करावीत.
- खोड माशी व चक्री भुंगा प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
- शेतात हेक्टरी १५ ते २० पक्षी थांबे लावावेत.
- प्रतिबंधात्मक उपायाकरिता ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचे आवाहन कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोयाबीनचे पीक सद्य:स्थितीत ३० ते ३५ दिवसांचे आहे. यादरम्यान, सोयाबीन पिकावर खोड माशी व चक्री भुंगा या किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. त्यामुळे या किडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.
- डॉ. धनराज उंदीरवाडे, कीटकशास्त्र विभागप्रमुख, पीडीकेव्ही, अकोला
Soyabean Market : ऑगस्ट 2025 मध्ये सोयाबीनचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर