गडचिरोली : शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष शेतात पेरणीपूर्व तयारीपासून ते काढणीपर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.
जिल्ह्यात सध्या 'क्रॉपसॅप' अंतर्गत २७, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत १७, मिलेट मिशनच्या २, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची १ आणि 'आत्मा' योजनेंतर्गत १२ अशा एकूण मोठ्या प्रमाणावर शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने भात, तूर, कापूस व ज्वारी या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार सहा टप्प्यांत मार्गदर्शन केले जात आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.
असे असतील प्रशिक्षणाचे सहा टप्पे
बियाणे निवड, उगवण क्षमता चाचणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करून दाखविणे. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापनाची माहिती दिली जाईल. दशपर्णी अर्क, जीवामृत तयार करणे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करण्यावर भर राहील. सूक्ष्म सिंचन, ठिबक व तुषार सिंचनाचे महत्त्व शिकवले जाते.
पिकावरील मुख्य कीड व रोगांची ओळख पटवून जैविक उपाययोजना सुचवल्या जातात. पीक कापणी प्रयोग आणि शेती दिनाचे आयोजन करून उत्पादनाचे मोजमाप केले जाते. पाणी फाउंडेशन मार्फत डिजिटल शेतीशाळांचे आयोजन केले जाते. या शेतीशाळांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले.
