नाशिक : काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यात (Deola Taluka) विठेवाडी परिसरात तणनाशक फवारणीमुळे कांद्याचे नुकसान झाले होते. पुन्हा तोच प्रकार मेशी परिसरात घडला आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी (Herbicide Spray) केल्यानंतर शंभर एकरपेक्षा जास्त कांद्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे. यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याविषयी निर्देश दिले आहेत.
सद्यस्थितीत कांदा लागवड (Kanda Lagvad) सुरु असून यासाठी शेतकरी प्रचंड मेहनत घेत आहेत. अशा स्थितीत तणनाशक फवारणीने शेतकऱ्यांची धूळधाण केली आहे. मेशी येथे शेतकऱ्यांनी इंडियन पेस्टीसाइड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास शंभर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अगोदरच मजुरीचे वाढलेले दर, महागडी रासायनिक खते, पहिल्यांदा टाकलेली कांद्याची रोपे खराब होऊन त्यानंतर दुसऱ्यांदा जास्तीचे दर देऊन कांदा बियाणे खरेदी करून नव्याने रोपे तयार केली. अतिवृष्टीने अगोदर खरिपाची पिके वाया गेली. मागील वर्षी दुष्काळामुळे हाती काहीच आले नाही. अशा अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र, कंपनीच्या सदोष औषधामुळे शेतकरी मात्र पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून याबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक लोक प्रतिनिधींची भेट घेत झालेला प्रकार सांगितला.
अस्मानीसह सुलतानी संकट ...
काबाडकष्ट करून लावलेल्या कांद्याची डोळ्यासमो राखरांगोळी झालेली पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. हाती असलेले भाग भांडवल खर्च झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरविले असून शेतकरी अस्मानीबरोबरच सुलतानी संकटात सापडला असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.