यादवकुमार शिंदे
सोयगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा ४० ते ४२.७ अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर राहिल्याने उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे.
या प्रखर उन्हाचा फटका थेट फळबागांना बसू लागला असून केळी, मोसंबी आणि लिंबूच्या बागा अक्षरशः होरपळून निघत आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
केळीच्या घडांवर काळे डाग; गुणवत्ता खालावली
तालुक्यातील बनोटी, सोयगाव आणि जरंडी परिसरातील केळी बागांची पाहणी केली असता, तीव्र उन्हामुळे केळीच्या घडांवर काळे डाग पडत असल्याचे दिसून आले.
वाढत्या तापमानामुळे केळीची पाने वळत असून झाडांची वाढ खुंटत आहे. त्यामुळे उत्पादनावर आणि फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
मोसंबीमध्ये फळगळती वाढली
दुसरीकडे, मोसंबीच्या बागांमध्येही उष्णतेचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. अनेक ठिकाणी फळांची गळती वाढली असून काही फळे करपली आहेत.
झाडांच्या फांद्या वाळू लागल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
१,८७१ हेक्टर फळबागा धोक्यात
तालुक्यात सुमारे १,८७१ हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. विशेषतः बनोटी परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे ३० एकरांवर केळीची लागवड केली आहे.
याआधी अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असतानाच आता उष्णतेच्या संकटाने शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणले आहे.
हवामानाचा दुहेरी फटका
अतिवृष्टीनंतर आता वाढत्या तापमानामुळे पिकांवर दुहेरी परिणाम झाला आहे. हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अधिकच अनिश्चित बनत चालल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
असे करा संरक्षण
हिमायतबाग फळ संशोधन केंद्र येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी फळबागांचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.
* झाडांना पाणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी द्यावे
* झाडांच्या मुळांभोवती आच्छादन (मल्चिंग) करावे
* लहान रोपांसाठी शेडनेटचा वापर करावा
* केळीवर 'केओलिन' फवारणी करून बाष्पीभवन कमी करावे
* मोसंबीच्या खोडावर बोर्डोपेस्ट लावून संरक्षण करावे
* आंब्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर करावा
शेतकऱ्यांची व्यथा
सुरुवातीला पावसाने नुकसान झाले, आता उष्णतेमुळे पिके करपत आहेत. उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्नाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असल्याचे शेतकरी सांगतात.
सोयगाव तालुक्यातील वाढत्या तापमानामुळे फळबागांना मोठा फटका बसत असून, शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना तातडीने राबवल्यास नुकसान काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, दीर्घकालीन उपायांसाठी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक ठरत आहे.
