अमरावती : रब्बी हंगामातील ज्वारी, मका आणि इतर भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने हमीभावाने खरेदी जाहीर केली आहे. (Hamibhav Kharedi)
या अंतर्गत १ मे ते ३० जूनदरम्यान प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.(Hamibhav Kharedi)
यंदा शासनाने मका, ज्वारी, बाजरी आणि रागी (नाचणी) या भरडधान्यांच्या खरेदीवर विशेष भर दिला आहे.
उत्पादनाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळावे, यासाठी खरेदीची ठोस उद्दिष्टेही निश्चित करण्यात आली आहेत.
'बीईएएम' पोर्टलवर नोंदणी आवश्यक
शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी बीईएएम (BEAM) पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
१ ते ३० एप्रिल या कालावधीत नोंदणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच खरेदीसाठी निश्चित वेळापत्रकानुसार बोलावले जाणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ऑफलाइन पद्धतीने खरेदी केली जाणार नाही.
खरेदी कालावधी व उद्दिष्टे
राज्यात १ मे ते ३० जून या दोन महिन्यांच्या कालावधीत खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यंदाच्या हंगामासाठी खालीलप्रमाणे खरेदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
धान (तांदूळ) : ५.९७ लाख मेट्रिक टन
मका : २.२९ लाख मेट्रिक टन
ज्वारी : २.१८ लाख मेट्रिक टन
बाजरी : ४० हजार मेट्रिक टन
रागी (नाचणी) : ८ हजार मेट्रिक टन
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी
हमीभावाने खरेदीमुळे बाजारातील चढ-उतारांचा फटका कमी होणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाइन नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केल्यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून नियोजनबद्ध पद्धतीने धान्य खरेदी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा : Organic Farming : उत्पादन वाढीचा फॉर्म्युला सापडला? शेतकरी शेणखतावर भर देतायत
