Halad Farming Formula : जालना तालुक्यातील घोडेगाव येथे हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले. (Halad Farming Formula)
कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनूने तसेच उद्यान विज्ञान तज्ज्ञ सुनील कळम यांनी हळद पिकाच्या प्लॉटला भेट देत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली.(Halad Farming Formula)
यावर्षी घोडेगावातील तीन शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हळद पिकाची लागवड केली आहे. शास्त्रज्ञांच्या पथकाने बालाजी खांडेभराड, ज्ञानदेव खांडेभराड आणि परमेश्वर खांडेभराड यांच्या शेतांना भेट देऊन पिकाची पाहणी केली.(Halad Farming Formula)
प्रति एकर १५० ते २०० क्विंटल उत्पादन शक्य
डॉ. सोनूने यांनी सांगितले की, सुधारित जातींची निवड व योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी १५० ते २०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळू शकते.
उत्पादक कंपन्यांमार्फत विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांबरोबर हळद हा फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
हळद लागवडीसंदर्भात नुकताच प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, बाजारपेठेतील संधी आणि मूल्यवर्धनाबाबत माहिती देण्यात आली.
सुधारित लागवड तंत्रज्ञानावर भर
उद्यान विज्ञान तज्ज्ञ सुनील कळम यांनी हळद पिकाचे महत्त्व, सुधारित जातींची निवड, दर्जेदार बेणे निवड, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच काढणी व विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
हळदीसाठी सुपीक व निचऱ्याची चांगली सोय असलेली जमीन निवडावी. कंदकूज, खोडमाशी, पाने गुंडाळणारी अळी व करपा यांसारख्या कीड-रोगांवर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या वेळी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर हळद लागवडीबाबत वाढती उत्सुकता दिसून आली.
योग्य तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास हळद हे पिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हळदीच्या या प्रयोगामुळे घोडेगाव परिसरात पर्यायी नगदी पिक म्हणून नव्या संधी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
हळदीतून विक्रमी उत्पादन कसं घ्याल?
हळदीतून प्रति एकर १५० ते २०० क्विंटल उत्पादन मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांगितलेला फॉर्म्युला साधा पण शिस्तबद्ध आहे. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या मार्गदर्शनानुसार खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात
योग्य जमीन व निचरा
सुपीक, सेंद्रिय घटकांनी समृद्ध जमीन निवडावी.
पाण्याचा निचरा चांगला असावा; पाणी साचल्यास कंदकूज वाढते.
सुधारित जातींची निवड
जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित व रोगप्रतिकारक जाती निवडाव्यात.
प्रमाणित, निरोगी बेणे वापरणे अत्यावश्यक.
बेण्यावर प्रक्रिया
लागवडीपूर्वी बुरशीनाशक/जैविक द्रावणात बेणे प्रक्रिया करावी.
त्यामुळे कंदकूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
संतुलित खत व पाणी व्यवस्थापन
माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा.
ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास वाढ जोमदार होते.
सेंद्रिय खतांचा समावेश केल्यास उत्पादन वाढते.
कीड-रोगांवर वेळीच नियंत्रण
कंदकूज, खोडमाशी, पाने गुंडाळणारी अळी, करपा यावर नियमित पाहणी.
सुरुवातीच्या अवस्थेतच नियंत्रण उपाय करणे आवश्यक.
योग्य काढणी व विक्री नियोजन
परिपक्व अवस्थेत काढणी करावी.
उत्पादक कंपन्या किंवा गट विक्रीद्वारे जास्त दर मिळवता येतो.
अधिक वाचा : Karela Farming : पारंपरिक पिकांना रामराम; कारल्याची गोडी का वाढतेय? वाचा सविस्तर
