नाशिक : नैसर्गिक संकटे यामध्ये अडकलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी सुरुवातीला अतिवृष्टीने तर मे महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काडी परिपक्वतेबरोबर रोगांच्या विळख्यात सापडल्याने व संकटावर संकट झेलून देखील तरी द्राक्षातून उत्पादनाऐवजी कर्जच वाढत चालले आहे.
येवला तालुक्यातील पाटोदा येथील सोमनाथ घोरपडे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने आलेल्या संकटांना कंटाळून द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. पाटोदा शिवारात एका शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बागेची लागवड केली.
रोगांचा प्रादुर्भाव
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष बागेची छाटणी करतात. यंदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे घड जिरण्याचे प्रमाण अधिक वाढले. काही शेतकऱ्यांच्या घडांमध्ये पाणी साचल्याने घड गळून गेले. पर्यायाने मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होऊन अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या.
उत्पादक अडचणीत
गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहेत. इतर पिकांच्या तुलनेत औषधांचा खर्च द्राक्षबागेला भरमसाठ येत असून वातावरणातील बदलामुळे बागा अधिक खर्चिक बनत चाललेल्या असून खर्चाच्या तुलनेत उत्पादन म्हणावे निघत नसल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत आहे.
२०१६ वर्षात जिल्हा बँकेचे कर्ज काढून दोन एकर द्राक्ष बाग उभी केली. बाग उभी करण्यासाठी १० लाखांपर्यंत खर्च केला. नंतर दरवर्षी छाटणी, मजुरी, औषधांचा खर्च करून बाग व्यवस्थित आली की अस्मानी संकट पुढे उभे राहायचे. द्राक्ष बागेतून एक रुपया देखील खर्च निघाला नसल्याने बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्ज कसे फेडावे अशी चिंता भेडसावत असून शासनाने बागेचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी.
- सोमनाथ घोरपडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पाटोदा ता. येवला.
