गडचिरोली : पीक पाहणी दरम्यान काही त्रुटी किंवा दुरुस्त्या आवश्यक असल्यास, त्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी मोबाइल ॲप लॉगिनद्वारे निश्चित कालावधीतच पूर्ण कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत. ई-पीक पाहणीच्या आधारेच विविध शासकीय योजना, विमा, अनुदान व नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी पीक नोंदणी आवश्यक आहे.
मागील खरीप हंगामातील पिकांचा पेरा नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर होती. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविला नाही. त्यामुळे त्यांना धान विक्रीसाठी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ऑफलाइन नोंद करण्याची संधी शासनाकडून मिळाली होती; परंतु शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.
नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्व्हे) सुरू करण्यात आली असली, तरी अद्याप अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. पिकांना संभाव्य धोक्यापासून विम्याच्या दृष्टीने संरक्षण कवच देण्यासाठी पीक पेऱ्याची ऑनलाइन नोंद ई-पीक पाहणी ॲपवर करणे आवश्यक आहे. शेतात पीक नसेल, तर 'चालू पड' अशी नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र पिकांची नोंद मोबाइल ॲपवर करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी स्तरावरील नोंदणीसाठी उरले १३ दिवस
शेतकरी स्तरावरील पीक नोंदणीसाठी १० डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ ही मुदत आहे. तर सहायक स्तरावरील कालावधी २५ जानेवारी ते १० मार्च २०२६ असा आहे. आता केवळ १३ दिवस उरले आहेत. या कालावधीत १०० टक्के ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू आहे.
Read More : हृदय चांगल ठेवण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, थंडीत कांदा खाण्याचे अनेक फायदे
