राहुल जगदाळे
रविवारी आलेल्या गोदावरीनदीच्या महापुरामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांतील तब्बल ४० हजार हेक्टर शेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. उसाला विशेष फटका बसणार नसला तरी कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर मातेरे झाले आहेत. सुमारे ४२ गावांमध्ये पूर शिरून ४० पेक्षा जास्त घरे कोसळली असून शेकडो घरांच्या भिंती खचल्या आहेत.(Godavari Flood Impact)
६० किलोमीटर परिसरावर पूराचा तडाखा
महाराष्ट्रातील गोदावरीनदीची एकूण लांबी ६६८ किलोमीटर असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ती अंदाजे ६० किलोमीटर वाहते. कमळापूर बंधाऱ्यापासून (वैजापूर) ते हिरडपूर बंधाऱ्यापर्यंत (पैठण) या परिसरातील शेतजमिनी पुराच्या पाण्याने व्यापल्या गेल्या. स्थानिक नद्यांमध्ये शिरलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान अधिक गंभीर झाले.
महापुरामागची कारणे
* वैजापूर तालुक्यात शनिवारी झालेली अतिवृष्टी.
* नाशिक जिल्ह्यातील धरणांतून २ लाख ८० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग.
* जायकवाडी धरणातील 'बॅकवॉटर' परिणाम.
* रविवारी जायकवाडीतून करण्यात आलेल्या ३ लाख ६ हजार क्युसेक विसर्गामुळे पैठण शहरासह ११ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण.
मानवी हानी व स्थलांतर
वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांमध्ये १०० पेक्षा अधिक नागरिकांची बोटींच्या साहाय्याने सुटका.
पूरामुळे सुमारे ४० घरे पूर्णपणे पडली, तर अनेक घरांच्या भिंती खचल्या.
परिस्थिती बिकट झाल्याने ९ हजार जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले.
जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान
अतिवृष्टीमुळे मागील पंधरा दिवसांपासूनच शेतीचे नुकसान होत होते. त्यातच गोदावरीच्या महापुरामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून गेला.
उस पिकाला तुलनेने कमी फटका बसला असला तरी कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात मातेरे झाले.
राज्यभरातील ६६ तालुक्यांमध्ये आतापर्यंत सुमारे दीड लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असल्याची नोंद झाली आहे.
त्यापैकी गोदाकाठच्या परिसरातील ४० हजार हेक्टर शेतीवर महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या हालचाली
जिल्हा प्रशासनाने बाधित गावांमध्ये मदत व सुटका कार्य सुरू केले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले की, गोदावरीच्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरच करण्यात येणार आहेत.
गोदावरीच्या महापुरामुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मातेरे, घरांचे पडझड, स्थलांतरित झालेले नागरिक या सर्व परिस्थितीत प्रशासनाने तत्काळ मदतकार्य वाढवण्याची गरज आहे.