Galmukt Dharan Galyukt Shivar 2.0 : राज्यातील जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून जलसाठ्यांची क्षमता वाढवण्याबरोबरच शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध करून देत दुहेरी लाभ मिळत असल्याचे चित्र आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात (२.०) मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात येत असून, त्यामुळे जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन वेगाने होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे ३,२६८ जलसाठ्यांमधून आतापर्यंत तब्बल ७.७३ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या उपक्रमामुळे ७७ लाख पाण्याच्या टँकर इतकी जलसाठवण क्षमता पुन्हा निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना मोठा फायदा
या योजनेचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात नेला असून, त्यापैकी ९१ टक्के शेतकरी वंचित घटकांतील असल्याचे विशेष आहे. गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनक्षमतेतही सुधारणा होत आहे.
लाखो नागरिकांना लाभ
या उपक्रमामुळे राज्यातील ११ हजार ५८३ गावांतील सुमारे १ कोटी ३९ लाख नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. जलसाठे वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होत आहे.
जलसुरक्षेकडे मोठे पाऊल
'गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०' हा उपक्रम राज्याच्या जलव्यवस्थापनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता वाढल्यामुळे भविष्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हा प्रकल्प प्रभावी ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दुहेरी लाभाची योजना
या योजनेमुळे धरणे आणि तलावांची पाणीसाठवण क्षमता वाढते
शेतकऱ्यांना मोफत सुपीक गाळ मिळतो
शेती उत्पादनात वाढ होते
ग्रामीण भागातील जलसंकट कमी होते
राज्यात जलसंधारणासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे 'पाणी वाचवा, शेती वाढवा' या उद्दिष्टाला मोठी चालना मिळत असून, भविष्यात आणखी व्यापक स्तरावर ही योजना राबवली जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : Maharashtra's 'Gaalmukt Dharan Gaalyukt Shivar 2.0' boosts water security and farmer income. Silt removal from dams enriches fields, benefiting lakhs of citizens. Water storage rises, combating drought.
Web Summary : महाराष्ट्र की 'गालमुक्त धरण गालयुक्त शिवार 2.0' जल सुरक्षा और किसान आय को बढ़ावा देती है। बांधों से गाद हटाने से खेत समृद्ध होते हैं, जिससे लाखों नागरिकों को लाभ होता है। जल भंडारण बढ़ता है, सूखे से मुकाबला होता है।