जळगाव : एकीकडे ओला दुष्काळाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. शासनाकडून बाधित शेतकऱ्यांना मदतही जाहीर केली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मिळालेली मदत परत करत सरकारला धारेवर धरले आहे.
पूरग्रस्तांना मदत म्हणून मिळालेली ३ हजार ९०० आणि २ हजार ९०० एवढी रक्कम अत्यल्प आहे. त्यामुळे नुकसानाची भरपाई होणार नाही. म्हणून ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, असे पत्र सोनखेडी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रदीप किरण पाटील यांनी तहसील कार्यालयात नुकतेच दिले आहे. प्रदीप पाटील यांना मिळालेली रक्कम अपुरी असल्याने त्यांनी निषेध केला आहे.
'उदरनिर्वाहासाठी ही नाही पुरणार'
सोनखेडी येथील प्रदीप किरण पाटील या शेतकऱ्याने निवेदनात म्हटले आहे की, शासनाने अतिवृष्टीमुळे मदत जाहीर केली आहे. अल्पभूधारक असल्याने खात्यात अनुक्रमे ३ हजार २०० व २ हजार २०० इतकी जमा होणार आहे. ही रक्कम उदरनिर्वाहाकरिता तुटपुंजी आहे.
आश्वासनाप्रमाणे हेक्टरी १८ हजार रुपये देण्याची मागणी
शासनाच्या जाहीर केलेल्या आश्वासनाप्रमाणे हेक्टरी १८ हजार रुपये मिळायला हवेत. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. एक वर्ष आम्ही दिवाळी साजरी नाही, केली तरी काही फरक पडणार नाही.
ही रक्कम तुटपुंजी असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून घ्यावी, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. हे पत्र शेतकरी प्रदीप पाटील यांनी निवासी नायब तहसीलदार सी. यु. पाटील यांना दिले आहे.