Flax Seed Cultivation : बदलत्या हवामानामुळे पारंपरिक पिकांचे उत्पादन व स्थिरता कमी होत असल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. (Flax Seed Cultivation)
अतिवृष्टी, दुष्काळाचा धोका आणि वाढते उत्पादन खर्च या सर्वांमुळे शेतकरी पर्यायी, कमी इनपुट असलेल्या आणि बाजारात मागणी असलेल्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. (Flax Seed Cultivation)
अशाच पिकांपैकी एक म्हणजे जवस (Flaxseed / Linseed). औषधी गुणांनी समृद्ध, पोषक मूल्यांनी भरलेले आणि कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे हे पीक यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नवा पर्याय बनले आहे.(Flax Seed Cultivation)
लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्या असून, त्यातील लक्षणीय हिस्सा जवस पिकाचा आहे. जिल्ह्यात सध्या २४ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जवसाची पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
जवसाचे हॉटस्पॉट
उदगीर आणि चाकूर तालुके जवसाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी ८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातही जवसाची पेरणी ६ हेक्टरपर्यंत पोहोचली असून, देवणी तालुक्यात २ हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले जात आहे.
जवसाची पेरणी वाढण्याची कारणे
जवसाची पेरणी वाढण्याची तीन प्रमुख कारणे समोर येतात. पहिले म्हणजे कमी खर्चात उत्पादन हे पीक इतर रब्बी पिकांच्या तुलनेत कमीत कमी खत व पाण्यावरही चांगले वाढते.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पावसाचा कमी धोका. जवसावर पावसाचा दुष्परिणाम तुलनेत कमी होतो, त्यामुळे बदलत्या हवामानातही शेतकरी ते आत्मविश्वासाने घेतात.
तर तिसरे मोठे कारण म्हणजे वाढती बाजारपेठ. जवसाचे तेल आरोग्यपूरक असल्याने त्याला मोठी मागणी असून, त्याचा वापर औषधे, कॉस्मेटिक उत्पादने आणि पारंपरिक आरोग्योपचारात मोठ्या प्रमाणात होतो.
कृषी विभागाच्या मते, योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी ८ ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते, ज्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे येत्या काळात जवसाची पेरणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बदलत्या हवामानात स्थिर उत्पन्न देणारा पर्याय म्हणून जवस पिक शेतकऱ्यांना नवी दिशा देत आहे.
