गोंदिया : देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील प्रयोगशील शेतकरी प्रकाश शिवणकर यांनी परंपरागत भात शेतीला फाटा देत नव्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यांनी पारंपरिक धान पिकांऐवजी आता नगदी पिके भाजीपाला, मका, फुलशेतीची निवड केली असून, त्यालाच मत्स्यपालनाची जोड दिली आहे. यातून त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
शिवणकर यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतीमध्ये मत्स्यपालन केलेल्या टाकीतील पाणी वाया न जाऊ - देता त्या पाण्याचा भाजीपाला शेतीसाठी केला. त्याचप्रमाणे शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढविला आहे. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवत उत्पादन वाढविण्याचा हा प्रयोग मदतपूर्ण ठरत आहे.
मत्स्यपालनासाठी त्यांनी शेतात सिमेंटची टाकी तयार केली. त्यात कतला, रोहू, डाळका आणि मृगाळ या जातींची माशांचे उत्पादन सुरू केले आहे. या प्रयोगामुळे शेतीसह त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे. प्रकाश शिवणकर यांच्या या अभिनव प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असून अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगदी पिकांकडे व पूरक व्यवसायांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक कृषी विभागानेही त्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले असून, अशा शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य व स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
